‘गावकऱ्यांचा सहभाग व शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण आपले गाव समृद्ध करू शकतो’ हा संदेश देताना कृषी, पणन व जलसंधारण विभागाने उभारलेले एकात्मिक पाटणलोट क्षेत्र विकास व समग्र शेती पद्धतीचे मॉडेल ‘कृषी वसंत’ प्रदर्शनातील आकर्षणाचा केंद्रिबदू ठरले.
कृषी वसंत प्रदर्शनात महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पणन व जलसंधारण विभागाने तब्बल एकरभर परिसरात हे मॉडेल उभारले आहे. या मॉडेलच्या सुरुवातीला अविकसित पाणलोट क्षेत्र दाखवण्यात आले आहे. या अविकसित पाणलोट क्षेत्राच्या विकासात गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्यास किती मनोहारी बदल घडून गावांचा विकास होतो, ते प्रकल्पाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासासाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आहेत.
या मॉडेलमध्ये शेततळे प्रकल्प तयार करण्यात आला आहे. कोरडवाहू शेतीची उत्पादकता वाढवणे, विकेंद्रित पाणी साठय़ाद्वारे सिंचनाची सुविधा निर्माण करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, सूक्ष्म सिंचन पद्धती, मूलस्थानी मृद व जलसंधारणाद्वारे ओलावा वाढवणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत. राष्ट्रीय कृषी योजनेच्या माध्यमातून राज्यातील २५ जिल्ह्य़ातील २५० तालुक्यात या मॉडेलची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या मार्केटच्या माध्यमातून ८८ हजार क्षेत्रावर संरक्षित सिंचन झाले आहे. राष्ट्रीय रोजागार हमी योजनेच्या माध्यमातूनही अनेक शेततळ्यांचा राज्यात विकास करण्यात आला आहे.  
कोरडवाहू शेतीची जलसिंचन उपलब्धता वाढवणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे. त्याचबरोबर जलस्रोतांची दुरुस्ती करणे, जलसाक्षरता चळवळ राबवून लोकसहभाग वाढवणे, पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत बळकट करणे, धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे हेही या अभियानाचे उद्देश आहेत. यामध्ये जलस्रोतांची दुरुस्ती करणे, वनराई बंधारे बांधणे, विहीर पुनर्भरण कामे यांचा समावेश आहे. या माध्यमातून राज्यात एकूण ७५ हजार टीसीएम पाणीसाठा झाला आहे.  
हा कार्यक्रम विदर्भासाठी तयार करण्यात आला आहे. यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत ५ वर्षांसाठी ३२५० कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. कोरडवाहू कापूस शेतीची उत्पादकता वाढवणे, सिंचनाची सुविधा निर्माण करणे, सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचा प्रभावी वापर, लघुसिंचन साधनांचे नूतनीकरण यांचा समावेश आहे. यामध्ये ढाळीची बांधबदिस्ती करणे, रुंद वरंबा व सरी, मृत सरी उघडणे, सिमेंट नाला बांधांचे खोलीकरण, विद्युत पंप पुरवठा, तुषार संच पुरवठा यांचा समावेश आहे.  
राज्य शासनाचा हा अभिनव उपक्रम असून या माध्यमातून वाहून जाणारे पाणी अडवणे, भूगर्भातील पाणी साठय़ात वाढ करणे, विकेंद्रित पाणी साठय़ाद्वारे सूक्ष्म सिंचन करणे हे उद्देश आहेत. या योजनेच्या माध्यमातून वाहत्या पाण्यावर एकापाठोपाठ साखळी पद्धतीने छोटे-छोटे सिमेंट बंधारे बांधण्यात येतात. या उपक्रमामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाला मोठे यश आले आहे.  
वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा व कोरडवाहू शेती अभियान हेही राज्य शासनाचे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मृदा संधारणाबरोबरच शेतीचे शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी या उपक्रमांचा मोठा उपयोग झाला आहे. कृषी प्रदर्शनात उभारण्यात आलेल्या या मॉडेलमध्ये कृषी वनीकरण, अंतरपीक पद्धत, प्रवाही सिंचन बंधारा, वनीकरण, पाझर तलाव, मृत सरी, माती बांध, कुरण विकास, समतल चर, मशागत, मजगी यांचा समावेश आहे. या मॉडेलमध्ये आदर्श गावाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. गावातील आदर्श शाळा, पाणवठे, पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची सुविधा, वीज योजना, अपारंपरिक ऊर्जेचा वापर यासारखे अनेक मॉडेल उभारण्यात आले आहेत. अविकसित पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने या योजना तयार केल्या आहेत. या योजनात जनतेने सहभाग घेतल्यास या राज्यातील ग्रामीण भागाचे चित्र सहज पलटू शकते, असा संदेशच या मॉडेलच्या माध्यमातून दिला आहे.