मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या प्रशासनाने रेल्वे आरक्षण केंद्रावर अनधिकृत एजंटांविरुध्द मोहीम हाती घेतली आहे. यात गुलबर्गा येथे चार अनधिकृत एजंट्सना २४ आरक्षित तिकिटांसह पकडण्यात आले.
अनधिकृत एजंटांद्वारे रेल्वेचे आरक्षित तिकीट काढणे, या तिकिटांचा दुरूपयोग करणे व प्रवाशांची लुबाडणूक करणे अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी विशेष मोहीम हाती घेऊन अनधिकृत एजंटांना अटकाव केला आहे. सहायक वाणिज्य व्यवस्थापक आय. भास्करराव यांच्या अधिपत्याखाली गुलबर्गा येथे दर्गाह संगणकीकृत तिकीट आरक्षण केंद्रावर धाड टाकण्यात आली. यात चार अनधिकृत एजंट सापडले. त्यांच्याकडून २४ आरक्षित तिकिटे हस्तगत करण्यात आली. त्याचे मूल्य १६ हजार २५० रुपये आहे. त्यांच्याकडून ७३९० रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली. शब्बीर अहमद (वय ३६), एम. ए. महेमूद (वय ३०), मोहम्मद इब्राहीम (वय २२) व प्रशांत देवीदास शेट्टी (वय ३०, चौघे रा. गुलबर्गा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द रेल्वे कायदा कलम १४३ नुसार कारवाई करण्यात आली. यात प्रत्येकी दहा हजारांचा दंड व तीन वर्षांपर्यंत सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. या चौघा अनधिकृत एजंटांना रेल्वे सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आले.