पोलीस असल्याची बतावणी करीत चार महिलांशी लग्न करणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ला सोनसाखळी चोरीत सांगली पोलिसांनी चतुर्भुज केले. विजय सदाशिव सूर्यवंशी असे त्या भामटय़ाचे नाव असून, त्याच्याकडून सोनसाखळी चोरीच्या अनेक घटनाही उघडकीस आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या भामटय़ाला संशयावरून ताब्यात घेतले होते.  
 संशयित विजय सूर्यवंशी हा मानमोडी येथे राहतो. त्याने १६-७-२०१३ रोजी मिरज नदीवेस येथील शिवलीला हंडीफोड यांच्या गळय़ातील एक तोळय़ाचे गंठण आणि विश्रामबाग वारणाली रोडवरील रेल्वे स्टेशन समोरून उमादेवी चंद्रकांत पाटील यांच्या गळय़ातील २ तोळय़ाचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरून हिसडा मारून लंपास केले होते. महिलांच्या गळय़ातील सोनसाखळी लांबविण्याच्या घटनांत वाढ होत असल्याने या चोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सोनसाखळी चोराच्या शोधासाठी पथके नेमली होती. त्यानुसार सोनसाखळी चोराच्या पाळतीवर असणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकातून विजयला ताब्यात घेतले.  
त्याने सोनसाखळी चोरीच्या दोन्ही घटनांची कबुली दिली आहे. याच चौकशी दरम्यान विजय सूर्यवंशी याने आपण पोलीस असल्याचे भासवून चार महिलांशी लग्न करून त्यांच्याही गळय़ातील सोनसाखळी चोरल्याची धक्कादायक कबुली पोलिसांसमोर दिली आहे. या कबुलीनुसार विजय सूर्यवंशी याच्यावर चोरीचा आणि महिलांना फसवून त्यांच्याशी लग्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी दिली.