News Flash

सीबीएसई गुणवंतांच्या वाढीचा अभियांत्रिकी प्रवेशाशी संबंध?

राज्य शिक्षण मंडळाच्या निकालात गेल्यावर्षीपेक्षा केवळ साडेपाच टक्क्यांनी वाढ झालेली असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) गुणवंत विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा झालेली प्रचंड वाढ चर्चेचा विषय

| May 31, 2013 04:58 am

राज्य शिक्षण मंडळाच्या निकालात गेल्यावर्षीपेक्षा केवळ साडेपाच टक्क्यांनी वाढ झालेली असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) गुणवंत विद्यार्थ्यांच्या निकालात यंदा झालेली प्रचंड वाढ चर्चेचा विषय झाली आहे. सीबीएसईच्या निकालातील अचानक वाढीचा अभियांत्रिकी प्रवेशाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील ९ विभागीय मंडळांचा एकत्रित निकाल यंदा ७९.९५ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.४६ टक्के होती. म्हणजेच यंदा निकाल ५.४९ टक्के जास्त लागला आहे. याउलट काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या सीबीएसईच्या निकालांवर नजर टाकली असता, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकेच नव्हे, तर ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ६२ टक्क्यांनी वाढली आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात घेतले जाणार असताना सीबीएसईच्या निकालात अचानक विक्रमी वाढ होणे हा योगायोग नसल्याचे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सीबीएसईने अतिशय उदारपणे केले हे स्पष्ट आहे. असे नसेल, तर तर्कानुसार ६२ टक्के जास्त विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा स्तर अचानक वाढला असे म्हणावे लागेल. परंतु असे होऊ शकत नाही हे सर्वाना माहीत आहे. अशारितीने सढळ हाताने गुण देणे आणि यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई आणि बारावीचे गुण एकत्रित होणे या दोन बाबींचा काहीतरी संबंध दिसतो, असे राज्य शिक्षण मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी)देखील बारावीच्या गुणांचा पात्रतेचा निकष म्हणून विचार करणार आहे. यंदा ५०० पैकी ३९१ गुण मिळवणारे सीबीएसईचे सर्व विद्यार्थी आयआयटीत प्रवेशासाठी पात्र मानले जाणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी आधी जेईई (मेन्स) आणि नंतर जेईई (अ‍ॅडव्हान्स्ड) परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे. सीबीएसईच्या ‘कट-ऑफ’ गुणांची ही टक्केवारी ७८.२० टक्के येते.
सीबीएसईच्या निकालात अचानक इतकी वाढ कशी काय झाली याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत गुरुनानक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जसपाल सिंग यांनी व्यक्त केले. अशारितीने निकालात एकदम इतकी वाढ करणे कुठल्याही शिक्षण मंडळाला शक्य नाही. आपल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची शक्यता वाढवण्यासाठीच सीबीएसईने असे केले आहे. याचा राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल याची मला चिंता वाटते, असे ते म्हणाले.
सीबीएसईने हे योजनाबद्ध रितीने केले असावे असे मला वाटते, कारण विद्यार्थी आणि शिक्षक यांचा दर्जा अचानक अनेकपटीने वाढला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, असे मोहता विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संजय चरलवार म्हणाले. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन झाले, तर किती उदारपणे गुण देण्यात आले हे दिसून येईल असेही त्यांचे म्हणणे होते. राज्य शिक्षण मंडळाचा विचार करता, गेल्या दोन वर्षांत जास्त गुण मिळवणाऱ्या (हाय स्कोअरर) विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे, परंतु सीबीएसईच्या बाबतीत नेमके उलट घडले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सीबीएसई अभ्यासक्रम लागू असलेल्या शाळांनी मात्र यामागे असा काही कट असल्याचे नाकारले. बारावीच्या परीक्षेत गुण देण्याच्या पद्धतीत कुणी ‘मॅनिप्युलेशन’ करू शकेल असला काही मार्ग नाही. विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळण्याचे एक कारण म्हणजे, उत्तर लिहिताना ‘की वर्ड्स’ लक्षात ठेवण्याचे महत्त्व आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात सतत बिंबवत असतो. पेपर तपासणारा परीक्षक हे ‘की वर्ड्स’च बघत असतो, असे इरा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य रीना दरगन म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 4:58 am

Web Title: cbses good result related to engineering
टॅग : Engineering
Next Stories
1 परिश्रम हाच खरा गुरू; गुणवंतांचा यशाचा
2 शिवाजी सायन्सची मक्तेदारी मोडीत; यंदा आंबेडकर कॉलेजचा वरचष्मा
3 अमरावती विभागाचा निकाल ८२.१९ टक्के
Just Now!
X