वीजजोडणीची वाढती मागणी लक्षात घेऊन शहरात नवीन ६०० खांब, लोंबकळणाऱ्या तारा सरळ करण्याचे व शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना वीज मंडळ व नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.
पालकमंत्री क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकारांशी चर्चा करताना शहरातील वीज व वाहतुकीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. शहरात व शहरालगत वाढत्या नागरी वस्त्यांमध्ये विजेची मागणी वाढली आहे. अनेक ठिकाणी शंभर ते दोनशे फुटांवरून नागरिकांना केबल वायरद्वारे जोडणी देण्यात आली. परिणामी एका जनित्रावर जास्तीचा भार पडल्याने विजेचाही लपंडाव होत आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बठक घेण्यात आली. वीज वितरण व्यवस्था सुरळीत व्हावी, या साठी सूचना देण्यात आल्यानंतर शहरात नव्याने जवळपास ५०० ते ६०० खांब उभे करून लोंबकळणाऱ्या तारा सरळ करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना विजेची सुविधा अधिक सुलभ उपलब्ध होईल.
या बरोबरच शहरातील विस्तारीत केलेल्या रस्त्यांवर योग्य प्रकारे नव्याने वीज खांब उभे केले जावेत. या खांबांमुळे अतिक्रमण होण्यास संधी मिळणार नाही. त्या दृष्टीने नालीला खेटून खांब उभे करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता सुंदर लटपटे यांना दिल्या. शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी धुळे-सोलापूर महामार्गावर सिग्नल बसविले आहेत. मात्र, सिग्नल तोडून जाण्याचे प्रकार घडत असल्यामुळे या सिग्नलवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत.