विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील शाळांनी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत आणि सुरक्षारक्षकांची नियुक्ती करून खबरदारी घ्यावी अशी सूचना केली असली तरी आणि त्यास शाळांकडून अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पाच वर्षांपूर्वी प्रथमच हा प्रयोग प्रत्यक्षात आणणाऱ्या अभिनव बाल विकास मंदिरातील ही व्यवस्था सध्या महिनाभरापासून तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याचे पुढे आले आहे. वर्ग अन् शाळेच्या परिसरातील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या यंत्रणेसोबत सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या विविध उपाययोजनांचा आर्थिक भार पालकांवर पडणार नाही याची दक्षता या शाळा व्यवस्थापनाने घेतली आहे. या शाळेने राबविलेला सीसी टीव्ही यंत्रणेचा उपक्रम शहरातील इतर शाळांसाठी पथदर्शक ठरणार असल्याने त्यातील तांत्रिक अडचण त्वरित दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गंगापूर रस्त्यावर मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर शाळेत तीन सत्रांत तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. प्रत्येक वर्गात बसविलेले सीसी टीव्ही कॅमेरे.. शैक्षणिक संकल्पना समजून घेण्यासाठी बसविलेले प्रोजेक्टर. आणि प्रत्येक मजल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून बसविलेली अग्निशमन यंत्रणा ही या शाळेची वैशिष्टय़े. ‘विद्यार्थी’ केंद्रबिंदू मानत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची आखणी करताना त्याची पालकांना झळ बसणार नाही याची दक्षता घेतली आहे. पोलीस यंत्रणेने शाळेमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केल्यावर त्याचा खर्च पालकांच्या माथी पडणार असल्याची साशंकता व्यक्त होऊ लागली. त्या पाश्र्वभूमीवर, या शाळेचे उदाहरण महत्त्वपूर्ण ठरेल.
या शाळेलगत केटीएचएम महाविद्यालय आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अंतर राहावे म्हणून स्वतंत्र संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवकांचे तांडे शाळेच्या आवारात भ्रमंती करणार नाहीत याची दक्षता घेतली गेली. शाळेला एकच मुख्य प्रवेशद्वार असून तिथे दोन सत्रांमध्ये प्रत्येकी एका सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात पालक वगळता प्रवेश करणाऱ्या प्रत्येक अनोळखी व्यक्तीची नोंद प्रवेशद्वारावर केली जाते. या ठिकाणी आलेली व्यक्ती, तिचे नाव, दूरध्वनी क्रमांक, शाळेत येण्याचे कारण हा संपूर्ण तपशील नोंदविला जातो. ही माहिती मुख्याध्यापकांकडे देण्यात येते.
खातरजमा झाल्यावर वर्गशिक्षकांमार्फत संबंधिताची त्या विद्यार्थ्यांची भेट घालून दिली जाते. तसेच शाळेच्या आवारात घडू शकणाऱ्या संभाव्य संशयास्पद हालचाली तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी शाळेत पाच वर्षांपूर्वी ३५ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. यामार्फत केल्या जाणाऱ्या चित्रीकरणाची नोंद केटीएचएम महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक विभागात होते. साधारणत: महिनाभराचे चित्रीकरण या ठिकाणी साठविता येते. त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितावर कारवाई अथवा समज दिली जाते. काही तांत्रिक अडचणींमुळे महिनाभरापासून ही यंत्रणा बंद आहे.
दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीचा विद्यार्थ्यांना सामना करता यावा म्हणून शाळा खास मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करते. शालेय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर ५ अग्निरोधक यंत्र बसविले आहेत. त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले जाते. वर्षांतून दोनदा व्यवस्थापनाकडून ‘फायर ऑडिट’ करण्यात येते. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने मुख्याध्यापक, परिवहन विभाग प्रमुख, पालक-शिक्षक संघ प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी आदींच्या सहभागाने गठित शालेय परिवहन समिती त्याचे नियोजन करते.
शाळेच्या १२ बसेसमधून दोन हजार २०५ विद्यार्थी प्रवास करतात. विद्यार्थी वाहतुकीतील अडचणींचा समिती निपटारा करते. याशिवाय वाहनचालक, क्लीनर यांच्या अडचणी, त्यांच्या जवळ आवश्यक कागदपत्रे, परवाना, बिल्ले यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. त्यांच्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येते.
मुले बेपत्ता होणे, विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न असे प्रकार गेल्या काही दिवसांत घडत असल्याने पोलीस यंत्रणेने शाळा व्यवस्थापनास विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्ष राहण्याची सूचना केली आहे. या घटनांमुळे पालक वर्गात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेची स्थिती नेमकी काय आहे, याचा घेतलेला हा वेध.