जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्याबरोबर रुग्ण तसेच रुग्णालयातील वैद्यकीय साधन सामग्रीच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्थापनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे रुग्णालय व परिसरात लवकरच कार्यान्वित होणारी सी. सी. टीव्ही कॅमेरा यंत्रणा.
जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमुळे होणारी गर्दी, क्वचित प्रसंगी होणारे वाद, कधी कधी कर्मचारी व रुग्ण यातील विसंवादामुळे उद्भवणारे प्रसंग, भुरटय़ा चोऱ्या यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि विविध विभागाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने रुग्णालयात आरोग्य विभागाकडून सी. सी. टीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती सुरू होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवींद्र शिंगे यांनी सांगितले. वास्तविक यापूर्वी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, आपत्कालीन कक्ष, औषध विभाग आदी ठिकाणी पाच ते सात कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र त्यातील चित्रीकरण संगणकात साठवून ठेवण्याची क्षमता अपुरी असल्याने त्याचा फारसा लाभ होऊ शकला नाही.
या पाश्र्वभूमीवर, आता रुग्णालयात १५ सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून मंजूर झालेले कॅमेरे शासकीय निकषानुसार अर्भक कक्ष, प्रसुती कक्ष, प्रसुती पश्चात असलेल्या कक्षात, बालरुग्ण, नवजात बालक अतिदक्षता विभाग (स्पेशल न्युनॅट केअर युनिट), कुपोषित बालक दक्षता विभाग (न्युट्रीशीन रिहॅबिटेशन सेंटर), बाह्य़ रुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, अपघात कक्ष, रुग्णालयाचे प्रवेशद्वार, औषधे, रुग्णालयातील अतिसंवेदनशील विभाग या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.
या संदर्भातील निधी मंजूर झाला आहे. मात्र निकषानुसार कंपनीचे कॅमेरे बसविण्याऐवजी ठेकेदाराने भलत्याच कंपनीचे कॅमेरे बसविले. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाने आरोग्य संचालकाकडे तक्रार केली. त्यानंतर पुन्हा निकषानुसार कॅमेरे बसविण्याचे काम सुरू झाले. हे काम सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर असून लवकरच रुग्णालय तसेच रुग्णालयाच्या आवारात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. यामुळे रुग्णालयातील अपुऱ्या मनुष्यबळावर काही अंशी उपाय निघू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.