News Flash

अमळनेर पालिका कर्मचाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर

कामकाज गतीमान आणि पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय अमळनेर पालिका कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आळा बसावा व नागरिकांची कामे वेळेत व्हावीत

| November 22, 2013 08:36 am

कामकाज गतीमान आणि पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
अमळनेर पालिका कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. पालिका कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आळा बसावा व नागरिकांची कामे वेळेत व्हावीत या हेतूने पालिकेकडून हा अभिनव उपाय योजण्यात आला आहे.
पालिकेचे कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामकाजात नेमके कोणते काम करतात, नागरिकांशी कसे वागतात, याचा अनुभव नगराध्यक्ष व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आपल्या कक्षामध्ये बसून घेता येणार आहे. कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहेत काय, याची खातरजमाही होणार आहे. पालिका परिसरातील घडामोडींवरही यामुळे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना लक्ष ठेवता येणार आहे. पालिकेच्या कारभारात पारदर्शकता यावी म्हणून अशा प्रकारची व्यवस्था करणे पालिकेला भाग पडले आहे.
पालिकेतील, पाणीपुरवठा, जन्म-मृत्यू नोंद, वसुली, आरोग्य यांसह सर्वच विभागात एकूण १४ सीसीटीव्ही कॅमेरे पालिकेकडून बसविण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांची जोडणी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कक्षाशी करण्यात आली आहे. विशेष निधीची तरतूद करून हे काम करण्यात आले आहे. यामुळे एकाच वेळी पालिकेतील सर्वच विभागातील घडामोडींवर नजर ठेवणे शक्य होणार असल्याचे नगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी नमूद केले.
पालिकेत समस्या अथवा तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना आपले काम मार्गी लागण्यासाठी कित्येक वेळा विनाकारण ताटकळत राहावे लागते. कर्मचाऱ्यांकडून वेळीच दखल घेतली जात नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. कर्मचाऱ्यांमधील या अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. पालिकेत अनेकदा लोकांकडून गोंधळ घालण्याचे प्रकारही घडतात. त्यालाही या कॅमेऱ्यामुळे आळा बसू शकणार आहे. प्रथमच असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून या पद्धतीचा जिल्हय़ातील इतर पालिकांनीही अवलंब केल्यास पालिकांच्या कामकाजात कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:36 am

Web Title: cctv in amalner corporation
Next Stories
1 मनमाड पालिकेची पाणीपट्टीत वाढ
2 शालेय बससेवेचे त्रांगडे
3 एसटी बस वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती
Just Now!
X