बोधगया बॉम्बस्फोट आणि मुंबईतही घातपात करण्याचा दहशतवाद्यांनी दिलेला इशारा, या पाश्र्वभूमीवर येथील मनमाड रेल्वे स्थानकासह अनेक संवेदनक्षम भागात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवासी गाडय़ांमध्ये शिरून गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी श्वानपथकाच्या मदतीने तपासणी केली. यापुढे किमान आठवडाभर अशी तपासणी सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली. एकीकडे अशी काटेकोर व्यवस्था ठेवण्यात येत असताना पोलिसांना मदतगार होईल अशी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही व सामान तपासणी यंत्रणा बंद असल्याचे दिसून आले.
मुंबईमध्ये घातपाताचा इशारा इंडियन मुजाहिद्दीन संघटनेने दिला आहे. या पाश्र्वभूमीवर अमृतसर, नांदेड यांच्यानंतर देशात सर्वाधिक मोठे गुरुद्वार असलेले मनमाड शहर हे संवेदनक्षम यादीत असून पोलिसांनी विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. मनमाड हे प्रमुख रेल्वे जंक्शन, शिवाय इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियन, हिंदुस्तान पेट्रोलियमची इंधन साठवणूक केंद्रे, भारतीय अन्न महामंडळाचे साठवणूक केंद्र, रेल्वेचा पूल निर्मिती कारखाना शहर परिसरात आहेत.
यामुळे अनेक वर्षांपासून मनमाड शहर दहशतवाद्यांच्या निशाणीवर आहे. त्यामुळे या सर्वच ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून तपासणी मोहीम सुरू आहे. गुरुवारी दुपारी मनमाड रेल्वे स्थानकात फलाटांवर प्रवाशांच्या सामानाची व विविध गाडय़ांतील प्रवासी डब्यांमध्ये शिरून श्वानपथकाने कसून तपासणी केली.