उरण तालुक्यातील सागरी किनाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली असून, या संवेदनशील परिसरावर नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार मोरा सागरी पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू केले असून, या माध्यमातून परिसरातील हालचालींवर मोरा सागरी पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मोरा सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत जागतिक ठेवा असलेले घारापुरी बेट, नौदलाचे शस्त्रागार, मोरा, केगावचा सागरी किनारा तसेच सागरी किनारपट्टीवरील गावे यांचा समावेश आहे. या गावातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोरा सागरी पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे उरण ते मुंबई असा सागरी प्रवास करण्यासाठी उभारण्यात आलेली मोरा जेटी व त्यातील प्रवाशांच्या हालचाली आणि किनाऱ्यावर नजर ठेवली जाणार आहे. मोरा सागरी किनारा या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असून मुंबईत घडलेल्या दहशतवादी कारवाईनंतर उरण परिसरातून दहशतवादी गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तर १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मोरा परिसरात पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशनही केलेले होते. त्यामुळे अशा परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसी टीव्हीचा फायदा होणार आहे.