परिसंवाद, व्याख्यान, मुलाखत, गौरव तसेच विविध स्पर्धाच्या माध्यमातून शहर परिसरात सामाजिक संस्था व संघटना यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांसह पुरूषांचाही कार्यक्रमांच्या आयोजनात सहभाग हे या महिला दिनाचे वैशिष्टय़े म्हणावे लागेल.

शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय
शहरातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयात ‘पूनव चांदणं अनुभवतांना’ या कार्यक्रमात आनंदवनात काम करणाऱ्या भावना विसुपते यांची मुलाखत मधुरा फाटक आणि अनिता खर्डे यांनी घेतली. मी, माझं, मला यापलिकडे जाऊन समाजसेवक बाबा आमटे यांचे कार्य समजून घेतल्याचे विसपुते यांनी सांगितले. या कामाचे कधीच ओझे वाटले नाही. उलट या कार्यामुळे स्वतच एक आनंदयात्री होण्याची अनुभूती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. प्रांजली चंद्रात्रे यांनी स्वागत केले. श्वेता काळे यांनी प्रास्ताविक तर, कवयित्री जयश्री वाघ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सासू-सून भावना विसपुते आणि उषा विसपुते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास साहित्यिक  विजयकुमार मिठे, जयश्री मालुंजकर, राजेंद्र सोमवंशी, शिरीष भालेराव यांच्यासह जलसंपदा विभागातील अनेक महिला कर्मचारी उपस्थित होत्या. मुलाखतीपूर्वी उपस्थित महिलांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला.

क्रीडा भारतीतर्फे वीरमाता जिजाऊ पुरस्कार सोहळा
क्रीडा भारतीच्या वतीने पंचवटीतील पलुस्कर सभागृहात वीरमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान सोहळा डॉ. पल्लवी धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कार्यक्रमास पश्चिम विभाग क्रीडा भारतीच्या उपाध्यक्षा सुमित्रा जाधव अध्यक्षस्थानी होत्या. हरीश गुप्ता, प्रशांत भाबड, संजय पाटील, प्रद्युम्न जोशी यावेळी उपस्थित होते. सशक्त व बलशाली राष्ट्राच्या निमिर्तीसाठी महिलांनी क्रीडा क्षेत्रात सहभाग नोंदवावा. त्यामुळे खऱ्या निरोगी समाजाची निर्मिती त्या करू शकतील असे मत डॉ. धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. सोहळ्यात डॉ. धर्माधिकारी यांच्या हस्ते छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या माता विजया दुधारे, कांताबाई माळोदे, लिला जाधव, भागिरथी निगळ, गंगु तांबे, शांताबेन पटेल, वैशाली वायदंडे, उलका पाटील, तारा भोई, कविता विधाते, सुमित्रा राऊत यांच्यासह समाजसेविका रुपाली जोशी, सुनिता पाटील यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वराली हरदास व ग्रुपने बालिका बचाव नृत्य नाटिका सादर केली. अनिषा मोगलने गणेश वंदना सादर केली. सुचिता कुकडे यांनी प्रास्ताविक, नेहा सोमठाणकर व नीलिमा दुसाने यांनी सूत्रसंचालन तर जागृती टिळे यांनी आभार मानले.

आरोग्य विद्यापीठात ‘महिला सबलीकरण’ व्याख्यान
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये ‘महिला सबलीकरण’ या विषयावर मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय विभाग संचालक डॉ. सुहासिनी नागदा, ज्येष्ठ पत्रकार वैशाली बालाजीवाले, विद्या परिषद सदस्या तथा महिला तक्रार निवारण समितीच्या डॉ. माया जामकर, कुलगुरू डॉ. अरूण जामकर आदींनी मार्गदर्शन केले. महिला दिन औपचारिक न करता मनापासून करावा. कोणतेही काम मनापासून केल्यास फरक दिसेल. महिलांनी कार्यालयामध्ये कसे काम करावे, त्यांच्या कामाची पध्दत कशी असावी, याबद्दल डॉ. नागदा यांनी माहिती दिली. विविध क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आरोग्यदायी शरीर असणे जसे गरजेचे आहे तसेच कामाचे नियोजनही आवश्यक ठरते, असेही त्यांनी सांगितले. बालाजीवाले यांनी सबलीकरणासाठी महिलांनी काय करणे आवश्यक आहे याची माहिती घेण्याचा सल्ला दिला. आज महिला घरासोबतच विविध आघाडय़ांवर काम करत असल्या तरी अद्याप त्यांचा विकास झालेला नाही. महिलांनी स्वतमध्ये आत्मविश्वास आणणे आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या. कुलगुरू डॉ. जामकर यांनी सबलीकरणासाठी मुलींना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याची आवश्यकता मांडली. मीना अग्निहोत्री यांनी सूत्रसंचालन केले.

समर्थ महिला मंडळातर्फे विविध स्पर्धा
समर्थ महिला मंडळाच्या वतीने आयोजित मेहंदी स्पर्धेत गरिमा सिंग, वैष्णवी देवगिरे, मयुरी सरोदे, पुष्परचना स्पर्धेत दक्षा कनकिया व ज्योती राजमाने, रांगोळी स्पर्धेत गायत्री नेर, श्रृती भावसार, साधना महाजन विजेते ठरले. विजेत्यांना जळगाव पीपल्स बँकेच्या व्यावस्थापक माधुरी खडसे यांच्यातर्फे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सीमा हिरे, संचालिका विजया राऊत, संगिता शिंदे, स्मिता कुलकर्णी आदी
उपस्थित होते.

येवल्यात नारी गौरव पुरस्कार सोहळा
येवला येथे ओम जयभद्रा सामाजिक प्रतिष्ठानच्या नारीरक्षा सामाजिक अभियान अंतर्गत ‘राज्यस्तरीय नारीगौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा डॉ. मधुसुदन घाणेकर, मुंबई दुरदर्शनचे राम खाकाळ, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे, वंदन पोतनीस आदींच्या उपस्थितीत झाला.
या सोहळ्यात राज्यातील पाच महिलांचा डॉ. घाणेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पैठणी महावस्त्र असे आहे. यावेळी नागपूरच्या कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, सातारा येथील लेक लाडकी अभियानाच्या अ‍ॅड. वर्षां देशपांडे, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाच्या संचालिका स्नेहलता कोल्हे आणि ‘राजमाता जिजाऊ’ चित्रपटाच्या निर्मात्या मंदा निमसे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना डॉ, वैद्य यांनी आमचा केलेला सन्मान हा समस्त नारींचा सन्मान असल्याचे सांगितले. संस्कार रुजविणारी स्त्री आहे. तिचे रक्षण यानिमित्ताने करू या असे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. देशपांडे यांनी महिलांवरील अत्याचाराचा ऊहापोह केला. कोल्हे व निमसे यांनी सामाजिक नारीरक्षा अभियान कार्याचे स्वागत करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. तुषार साळुंके यांनी आभार मानले.