गुलाबी थंडी आणखी गडद झाली असताना सर्वाच्या आनंदाचा नाताळाचा उत्सव नागपूर नगरीत आज मध्यरात्रीपासून सुरू झाला. उद्या, दिवसभरात नाताळाची धूम चालणार असल्याने नागपूर सज्ज झाली आहे. आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वधर्मीयांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. बहुप्रतीक्षित नाताळाच्या निमित्ताने नागपुरातील चर्चेस अत्यंत सुरेख पद्धतीने सजविण्यात आले असून वाद्यवृंदांच्या सुरांनी वातावरणात गोडवा निर्माण केला आहे. शुभेच्छांचे एसएमएस सुरू झाले आहेत..
ख्रिसमस हा आनंदाचा, सौहार्दाचा आणि शांततेची शिकवण देणारा सण असल्याचे लिहिलेली भेटकार्डे परस्परांना दिली जात आहेत. लहान-थोरांचे आवडते सांताक्लॉज चौका चौकात, पेट्रोल पंपांवर उभे राहून ‘गिफ्ट’ देत असल्याने बच्चे कंपनी खुश आहे. सांताक्लॉजची टोपी घालून ‘मेरी ख्रिसमस’च्या शुभेच्छा देत तरुणाई दुचाकी-चारचाकींमधून फिरताना दिसत आहे. चर्चचा घंटानाद आणि प्रार्थनेसाठी खास वाद्यवृंद तयार आहेत. समूहगान जास्तीत जास्त लोकांना आवडावे, यासाठी पूर्वतयारी झाली आहे.
सदर, मेकोसाबाग, सेमीनरी हिल्स, कामठी, अजनी, गिरीपेठ, खलासी लाईन, मोहननगर या ख्रिश्चनबहुल वस्त्यांमध्ये घराघरांवर रोषणाई, आकाश कंदिलांनी आनंदात भर टाकली आहे. नाताळाचा महत्त्वाचा भाग असलेल्या केकचे एकापेक्षा एक सरस प्रकार बाजारपेठेत दिसू लागले आहे. स्पेशल पेस्ट्रीज, ख्रिसमस स्वीटस्ने मिठाईची दुकाने सजली आहेत. नवीन कपडय़ांची खरेदी, खास ख्रिसमस ड्रेसेस, प्रार्थनेसाठीचे लहानांसाठी हौसेने तयार करवून घेतलेले खास मिनी ड्रेसेसची रंगत रस्त्यांवर दिसू लागली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 2:26 am