20 September 2020

News Flash

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर उपराजधानीत नागरिकांचा जल्लोष

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना शहरातील विविध भागात ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करीत कायकर्ते आणि नागरिकांनी जल्लोष केला.

| November 1, 2014 09:46 am

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरू असताना शहरातील विविध भागात ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करीत कायकर्ते आणि नागरिकांनी जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहण्यासाठी चौकांमध्ये दूरदर्शन संच आणि मोठे स्क्रीन बसवण्यात आले होते. काही चौकांमध्ये फटाके उडवून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. 

भाजपचे शहरातील कार्यकर्ते, नगरसेवक आणि वरिष्ठ नेते मुंबईला गेले असले तरी त्यांनी आपापल्या भागातील नागरिकांना शपथविधी सोहळा पाहण्याची सोय करून दिली होती. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर शहरात उत्साहाचे वातावरण होते. फडणवीस यांचे समर्थक, नातेवाईक आणि भाजपचे पदाधिकारी शपथविधी सोहळा अनुभवण्यासाठी मुंबईला गेले. शपथविधी सोहळा सुरू असताना शहरातील विविध भागात जल्लोष केला जात होता. अनेक चौकात महिला कार्यकर्त्यांनी रांगोळी काढल्या तर काहींनी देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स, कट-आऊट लावले होते. या सोहळा घरी एकटय़ाने न बघता कार्यकर्त्यांसोबत बघून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर असल्याचा फील यावा म्हणून झांशी राणी चौकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या शाखेजवळ एलसीडी टीव्ही, डी.जे. आणि कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुच्यार्ंची व्यवस्था करण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघण्यासारखा होता.
महालातील बडकस चौकात मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. त्यावर शपथविधी सोहळ्यासाठी बाजारात खरेदीसाठी बाहेर पडल्यांनी गर्दी गेली होती. शिवाय परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली. या चौकात दुकान असलेल्या एका मिठाईवाल्याने स्वखुशीने उपस्थितांना मिठाई वाटली. ढोल-ताशे वाजवण्यात येत होते. तर अधूनमधून पक्षाचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जयघोष करण्यात येत होता. काही उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके उडविले. हा परिसर जुन्या वस्तीचा असल्याने तसेच बाजारपेठ असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. हा शपथविधी कार्यक्रम टीव्ही स्क्रिनवर बघण्याची व्यवस्था करण्यात आल्याने आणि फटाके उडविण्यात आल्याने वाहतूक विस्तळीत झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. नागपूरच्या एका भाजपच्या कार्यकर्त्यांला मुख्यमंत्र्यांचा मान मिळाला याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. महालातील गडकरी वाडय़ावर शांतता असली तरी महाल आणि शिवाजी पुतळा चौकात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
धंतोलीतील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यात महिलांचा सहभाग लक्षनीय होता. महिलांनी ढोल ताशांचा निनादात महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. लक्ष्मीभुवन चौकात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रा.स्व.संघ स्मृती भवन परिसरात एका चौकात एलसीडी टीव्ही लावण्यात आला होता. या येणारे-जाणारे शपथविधी सोहळा पाहण्यासाठी थांबत होते तर परिसरातील लहान मुले फटाके उडवित होते. अशाप्रकारचा माहोल इतवारी, मस्कासाथ, वर्धमाननगर, अभ्यंकरनगर, गोपालनगर, प्रतापनगर चौक, शहीद चौकात होता. शहर भाजपमय झाले होते. घरोघरी आणि शासकीय व निमशासकीय कार्यालयात शपथविधी सोहळा बघितला जात होता.

बंगल्यावर शपथविधीचा क्षण साजरा
‘जिधर भी देखो यारो क्या खूब है नजारा, देखो सीएम बना है फडणवीस हमारा’ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आपल्या नेत्याच्या शपथविधीचा क्षण साजरा केला. धरमपेठेतील त्रिकोणी पार्क परिसरातील नागरिकही आपल्या व्हीव्हीआयपी शेजाऱ्याच्या आनंदात सहभागी झाले होते. दुपारपासून काही कार्यकर्ते फडणवीस यांच्या निवासस्थानी जमले होते. साडेचार वाजता फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व मिठाई वाटून हा विशेष क्षण साजरा केला. परिसरातील नागरिकांनी घरांवर फलक लावून नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. नजीकच्या लक्ष्मीभुवन चौकात मोहम्मद जहीर यांनी या प्रसंगासाठी रचलेले विशेष गीत गायकांनी सादर केले. या ठिकाणी एक मोठा स्क्रीन लावण्यात आला होता व मिठाई वाटण्यात आली. चौकातील काही दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने फळेदेखील वाटली.
निवडणुकीत भाजपचा विजय किंवा एखाद्या राज्यात सत्ता स्थापन होत असताना शहरातील विविध भागात महापालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, भाजप कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात जल्लोष करीत असतात मात्र यावेळी मोठय़ा जल्लोषाची उणीव शहरात जाणवली. नागपूर शहरातून पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते असे पाच ते सहा हजार लोक शपथविधी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यास मुंबईला गेले त्यामुळे ग्रामीण आणि शहरात काही ठराविक चौक सोडले तर अन्य ठिकाणी शांतता होती. भाजयुमोचे कार्यकर्ते विविध भागातील जल्लोषात सहभागी झाले होते. टिळक पुतळ्याजवळील भाजपच्या कार्यालयाजवळ एरवी मोठय़ा प्रमाणात जल्लोष असतो मात्र त्या ठिकाणी शांतता होती. केवळ इमारतीवर रोषणाई लावण्यात आली होती. गणेशपेठमधील प्रचार कार्यालयात काही मोजकेच लोक दूरदर्शन संचावर कार्यक्रम पहात बसले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 9:46 am

Web Title: celebrations in nagpur after fadnavis takes oath as cm
टॅग Devendra Fadnavis
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांशी जवळीकतेची सोशल मीडियावर अहमहमिका
2 धरमपेठेतील रस्त्यांना झळाळी
3 अमेरिकेत राहणाऱ्या नागपूरकराचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न
Just Now!
X