सोमवारी गुरुपौर्णिमा. रूढार्थाने ‘सद्गुरु’ सगळ्यांनाच भेटतो असे नाही. परंतु आयुष्याला निर्णायक वळण देणारे ‘गुरुवर्य’ बहुतेकांच्या आयुष्यात येतातच येतात. आजच्या तरूण पिढीचे ‘आयकॉन’ ठरतील अशी पाच ख्यातनाम मंडळी आपापल्या ‘गुरुवर्या’बद्दल सांगताहेत, गुरुपौर्णिमेनिमित्त!
हत्तीचे बळ देणारे लाकोळे गुरुजी
माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ग्रामीण भागात तेव्हा शिक्षणाचे फारसे महत्त्व त्यावेळी नव्हते. सर्वागीण विकासाचे शिक्षण तेव्हा कुठले मिळायला? पण त्या परिस्थितीतही मला घडविणारे, संस्कार करणारे, आत्मविश्वास निर्माण करणारे शिक्षक मला लाकोळे गुरुजींच्या रूपात भेटले. प्राथमिक शाळेत आम्हाला ते अंकगणित शिकवायचे. हा क्लिष्ट विषय हसतखेळत गोष्टीच्या रूपाने सांगण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळेच मी त्यांच्या तासाची वाट बघायचो. लाकोळे गुरुजींनी सर्वच विद्यार्थ्यांवर मुलासारखे प्रेम केले. माझ्या आयुष्यातला ते पहिला आधारवड होते. मी फार हुशार नव्हतो. पण गुरुजींना माझ्यातली चमक दिसली असावी. माझे ते कौतुक करीत. त्यामुळे बरं वाटायचं, हुरूप यायचा. वास्तविक त्यांची दोन्ही मुले हुशार होती. पण त्यांना ते म्हणायचे, केवळ हुशार असून चालत नाही. विश्वाससारखे अष्टपैलू बना. त्यांचे हे शब्द मला हत्तीचे बळ देऊन जात. आज मी जो काही आहे, तो गुरुजींच्या या शब्दांनी मिळालेल्या बळावर! गुरुजींचा मोठा मुलगा दहावीला केंद्रात पहिला आला. पण मानसिक स्थिती बिघडल्याने तो खचला आणि त्यातच तो गेला. गुरुजी त्या डोंगराएवढय़ा दु:खातूनही सावरले. त्यांचा गेलेला मुलगा त्यांनी माझ्यात पाहिला. सातवीनंतर गुरुजींचा संपर्क कमी झाला. पण त्यांचे धीराचे आणि प्रोत्साहनपर शब्द मला बळ देत राहिले. आयपीएस झाल्यावर माझी गावात मिरवणूक निघाली तेव्हा गर्दीत उभ्या असलेल्या गुरूजींचे मी पाय धरले. मला मिठी मारून गुरूजी आनंदाने ढसाढसा रडले. तो माझ्या आयुष्यातला एक मोठा क्षण होता. विश्वास ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे, हे जेव्हा ते म्हणायचे तेव्हा माझे डोळे पाणवायचे. माझे यशाने त्यांना आयुष्य सार्थकी लागल्याचा आनंद झाला. आज गुरूजी नाहीत. पण ते नसते तर..? कल्पनाच करवत नाही.
पुस्तके सावलीसारखी साथ करणारे गुरु
साधारणपणे प्रत्येक मुलाचा एकाच शाळेशी संबंध येतो. माझे थोडे वेगळे आहे. माझी प्राथमिक शाळा पुण्याची भावे हायस्कूल. त्यानंतर मी आकुर्डीच्या भाळसाकांत विद्यालयात होतो. मला घडविण्यात या दोन्ही शाळांतील शिक्षकांचा मोठा वाटा आहे.मला आठवतंय, मी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच कविता करतोय. पण भावे हायस्कुलात हे कुणालाच माहीत नव्हते. कविता करण्याबरोबरच वक्तृत्व, नाटय़वाचन या उपक्रमांमध्ये मी पुढे होतो. त्यासाठी माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी बऱ्याचदा ‘आऊट ऑफ द वे’ जाऊनही मदत केली होती. भाळसाकांत विद्यालयात असताना मी मराठीच्या शिक्षकांना माझी एक कविता वाचून दाखविली होती. ती कविता ऐकून त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आणि माझी कविता मोठय़ा अभिमानाने सगळ्या वर्गाला वाचून दाखवली होती. आता त्या सरांचे नावही आठवत नाही. पण पाठीवर कौतुकाने पडलेला हात अजूनही आठवतो. त्यानंतर आयुष्यात अनेक गुरू लाभले. पण सावलीसारखी साथ करणारा एकच गुरू मिळाला तो म्हणजे पुस्तके.
हस्ताक्षरावर मेहनत घेणाऱ्या बरखा मॅडम
शाळेची आठवण काढली की अगदी प्रत्येक तासानुसारचे शिक्षक, त्यांच्या सवयी, त्यांच्या कळत-नकळत केलेला दंगा, कधी त्यांच्याकडून मिळालेली शिक्षा, कधी शाबासकीची थाप.. अनेक गोष्टींची गर्दी मनात होते. परंतु ज्या वयात शाळा काय हे समजतही नव्हते त्या वयात हात हातात धरून ए बी सी डी लिहायला शिकवणाऱ्या बरखा मॅडम मला जास्त जवळच्या वाटतात. पवईच्या हिरानंदानी फाऊंडेशन हायस्कू ल ही माझी शाळा. तिथे शिशु आणि बालवर्ग दोन्ही वर्ष बरखा मॅडमनीच मला शिकवले. आमच्या शाळेचे वातावरण खूप कडक शिस्तीचे होते. तेवढय़ा लहान वयात ए बी सी डी काढता आली तरी पुरेसे होते. पण, आम्हाला शाळेत ए बी सी डी कर्सिव्ह शैलीतच लिहिली पाहिजे हा नियम होता. मला काही केल्या ते जमत नव्हते. माझा कस्र्यू शैलीतील ‘वाय’ मला स्वत:लाच एखाद्या मच्छरसारखा वाटायचा. एके दिवशी बरखा मॅडमनी या ‘वाय’ वरून गंमतीजमती सांगत कधी माझ्याकडून सुंदर अक्षर काढून घेतले मलाच कळले नाही. पण, मग प्रत्येक अक्षर एक गंमतीशीर खेळासारखे झाले. त्या जे शिकवायच्या ते इतके आवडायला लागले की माझी ए बी सी डी कागदावरही सुंदरपणे उतरली. बरखा मॅडमनी त्यावेळी माझ्या हस्ताक्षरासाठी मेहनत घेतली ती इयत्ता दहावीपर्यंत मला चांगलीच उपयोगी पडली. कारण, अभ्यासात भलेही मला कधी चांगले गुण मिळाले नसतील पण पहिलीपासून ते दहावीपर्यंत मी हस्ताक्षर स्पर्धेत कधी पहिला-दुसरा क्रमांक सोडला नाही. हिंदी आणि इंग्रजीमध्येही मला पैकीच्या पैकी गुण मिळायचे ते हस्ताक्षराच्या जोरावर. बरखा मॅडमनी मला तेवढी दोनच वर्ष शिकवले असले तरी त्यांच्याबरोबर माझे कायम नाते जोडले गेले.
प्रकाशवड
आतापर्यंत अनेकांना माझ्या हृदयात गुरूस्थान दिले. मग ते शाळेत भेटलेले महाजन सर असोत किंवा अध्यात्मातील नाना अभ्यंकर. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करणाऱ्याला मी गुरूच मानतो. शाळेतील चित्रकलेच्या महाजनसरांना माझ्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्रकलेली आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शाळेचे थोडे दुर्लक्षच होते. पण महाजन सर निराळेच होते. चित्रकला आणि चित्रकलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. म्हणूनच त्यांच्या आठवणी आजही माझ्या मनात ताज्या आहेत. महाविद्यालयातील कोलते सरांनाही विसरताच येणार नाही. एकदा मी उजेड आणि अंधाराची छटा दर्शविणारे चित्र रेखाटले होते. ते कोलते सरांकडे घेऊन गेलो आणि अंधारात उजेडाची छटा दाखविण्याचा प्रयत्न करत होतो. सरांनी मला मध्येच थांबवले आणि म्हणाले, ‘चित्र अंधारात कशाला दाखवतो, उजेडात धर. चित्रांची तीव्रता उमजेल असे चित्र रेखाट ते अधिक परिणामकारक होईल.’ उत्तम ज्योतिषी असलेले नाना अभ्यंकरही मला गुरुस्थानी आहेत. माझ्या चित्रांमधील उणीवा ते दाखवत. निरीक्षणावर भर देण्याचा त्यांचा सल्ला मोलाचा ठरला आहे. अनेकवेळा चित्रकार चित्र अर्धवट सोडतात. न आवडल्यामुळे किंवा कंटाळा आल्यामुळे ते फाडूनही टाकतात. कधीही चित्र अर्धवट सोडू नको. त्यातीतल चुका सुधारून ते पूर्ण कर, असे सर सांगत. एखादी चूक घडली तर भविष्यात आपण सुधारतो ना? मग चित्राचेही तसेच आहे.  त्यांचे म्हणणे मला तंतोतत पटले आणि चित्र पूर्ण करण्यावर मी कटाक्ष दिला. अनेक पाश्चात्य चित्रकारांच्या चित्रांतूनही मी अनेक गोष्टी शिकलो. वंशपरंपरेपक्षा गुरूशिष्याच्या परंपरेला अधिक महत्त्व आहे. राजेशाही वंशपरंपरेने येते पण गुरु-शिष्य पंरपरेचे तसे नाही. गुरुंनी दिलेली शिदोरी शिष्याने पुढे न्यायची असते किंबहुना गुरूपेक्षाही अधिक चांगले काम करायचे असते.
चूक कबूल करण्यात कमीपणा नाही!
डोंबिवलीतील आमच्या महाराष्ट्र विद्यालयात बडगुरु नावाचे चित्रकला शिक्षक होते. तेच आमचे स्काऊटचेही शिक्षक होते. एक प्रसंग चांगला लक्षात राहिला आहे. आमचा कॅम्प गेला होता. काही कारणाने फक्त मी स्काऊटचा गणवेष घालून गेलो नव्हतो. आमचे मुख्याध्यापक कॅम्पमध्ये आले आणि सगळ्या मुलांमध्ये मीच गणवेषात नसल्याचे पाहून त्यांनी मला बाजूला उभे केले. तेव्हा बडगुरू गुरुजींनी माझी बाजू सावरून घेतली. त्यानंतर बडगुरू गुरुजी मला म्हणाले की, चूक झाली तर ती मोकळेपणाने मान्य करावी. त्यात कमीपणा वाटून घेऊ नये. तू मुख्याध्यापकांकडे जाऊन चूक मान्य कर. पुन्हा असे घडणार नाही, असे सांग. त्यांनी सांगितल्यानुसार मी मुख्याध्यापकांकडे जाऊन चूक कबूल केली. हातून काही चूक झाली तर ती मोकळेपणाने ती कबूल केल्याने मनात अपराधीपणाची भावना राहात नाही, अस्वस्थता संपून मन शांत होते, हा अनुभव मी घेतला. तो आजही मला उपयोगी पडतो. याच शाळेत आम्हाला रामचंद्र विष्णू टोळ हे शिक्षक होते. ते निवृत्त झाल्यानंतरही आम्हाला शिकवायचे पारंपरिक गुरुजी किंवा पंतोजी या पठडीतील ते होते. धोतर, पांढराशुभ्र शर्ट आणि डोक्यावर टोपी असा त्यांच्या पेहराव असायचा. अत्यंत शांत स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. एकदा आजारपणामुळे एका परिक्षेला मी बसू शकलो नाही. मी अस्वस्थ झालो. टोळ गुरुजींशी बोलल्यानंतर ते म्हणाले, अरे असे प्रसंग येत असतातच. खचून न जाता त्यांना धैर्याने तोंड दिले पाहिजे. यालाच अनुभव म्हणतात आणि तेच आपल्याला खूप काही शिकवून जातात. टोळ गुरुजींचे ते वचन आजही मला खूप उपयोगी पडते.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…