नागपूर शहरातील काही सेलिब्रिटींनी अगदी सर्वसामान्यासारखे मतदान केले. तर काहींनी विविध कामासाठी बाहेर असल्याने मतदानाचा हक्कच बजावला नाही.
साहित्य क्षेत्रात जागतिक पातळीवर मान्यता मिळवणारे ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी सकाळीच मतदान केले. त्यांचे मतदान हिंदू ज्ञानपीठ शाळेतील मतदान केंद्रावर झाले. साध्या पद्धतीने ते केंद्रावर आले. यावेळी रांगेत दोन-चारजण होते. त्यांच्या मागे ते उभे राहिले आणि मतदान करून घरी परतले. त्यांच्याकडे काही छायाचित्रकारांनी छायाचित्र काढण्याची विनंती केली परंतु त्यांनी त्यास नकार दिला.
महेश एलकुंचवार, ज्येष्ठ नाटककार

अरुंधती स्विपच्या वाहनातून लोकांची शाळा येथील मतदान केंद्रावर सकाळी ११.३६ वाजता पोहोचली. यावेळी पाऊस पडत होता. ती गाडीतून उतरली आणि धावत मतकेंद्राकडे आली. तिच्यासोबत तिची लहान बहीण, वडील आणि स्विपचे प्रमुख होते. या शाळेत मतदान अधिकारी म्हणून अरुंधतीची आई कर्तव्यावर होती. मतदार यादीतील अनुक्रमांक आणि मतदानाची खोलीविषयी तिच्या आईने माहिती दिली. छायाचित्रकारांनी एकच गर्दी केली होती. पाऊस येत असल्याने मतदार नव्हते. त्यामुळे रांगेत न राहता थेट मतदान करता आले. तिचे हे पहिलेच मतदान होते. स्पर्धेसाठी बाहेरगावी असल्याने लोकसभेला तिला मतदान करता आले नव्हते.
अरुंधती पानतावणे, बॅडमिंटनपटू

सकाळचे काम ओटोपून धंतोली येथून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास निघाल्या आणि देवनगरातील नरकुंदकर संस्थेच्या इमारतीमधील मतदान केंद्रावर पोहोचल्या. दुपारीची वेळ असल्याने दोन चार मतदार रांगेत होते. त्या रांगेत उभ्या राहिल्या आणि मतदान केले.  
डॉ. सपना शर्मा, मिसेस इंडिया उपविजेती

सकाळी ठीक साडेआठ वाजता जी.एस. कॉलेजच्या मतदान केंद्रावर पोहोचले. अगदी सर्व सामान्यसारखे मतदारांच्या रांगेत उभे राहिले. पाच ते सात मतदारच्या त्यांच्यापुढे होते. मतदान करून बाहेर पडल्यानंतर काही निवडक प्रेस छायाचित्रकारांनी त्यांना पोझ देण्याची विनंती केल्याने रांगेतील मतदार, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे नजरा तिकडे वळल्या आणि त्यांच्याविषयी ज्यांना माहिती नव्हते ते शेजारी असलेल्या व्यक्तीला विचार होते.
विष्णू मनोहर, शेफ

मतदानाला प्रारंभ होताच आशाताई धरमपेठेतील रजत महोत्सव हायस्कूलमधील मतदान केंद्रावर पोहोचल्या. मतदान केंद्रावर फारसे मतदार नसल्याने अगदी काही मिनिटात त्यांचे मतदान पार पडले. ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांचा ओळख परिसरात आहे. परंतु कुठलाही बडेजाव नव्हता.
आशा बगे, ज्येष्ठ साहित्यिक

मतदान केले नाही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत लखनौला गेले आहेत. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. लोपामुद्रा राऊत (फेमिना मिस इंडिया गोवा-२०१३) आज मुंबईत असल्याने मतदान करू शकली नाही.क्रिकेटर उमेश यादव शहरात नसल्यामुळे मतदान करू शकला नाही.