बँक कर्मचारी संघटनेच्या पूर्व विभाग महाराष्ट्र शाखेची परिषद संपन्न
केंद्र सरकारचे आर्थिक धोरण निष्प्रभ ठरल्याने महागाई आकाशाला भिडली असून बेरोजगारी मोठय़ा प्रमाणावर वाढली असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे नेते वि. वा. आसई यांनी केले.
बँक कर्मचारी संघटनेच्या पूर्व विभाग महाराष्ट्र शाखेची परिषद अमरावती मार्गावरील सवरेदय आश्रम येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर.एस. चोखांद्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे महासचिव एन.के. शोम होते. केंद्र सरकार आर्थिक आणि बँकिंग सुधारणा करू इच्छित आहे. परंतु, डाव्या पक्षांनी त्याला विरोध केला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांचे विलिनीकरण करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहे. भारतीय बँक संघाने कठोर भूमिका घेतल्याने दहाव्या वेतन कराराची बोलणी फिस्कटली असल्याची माहिती आसई यांनी यावेळी दिली. येत्या १२ डिसेंबर २०१३ ला संसदेवर मोर्चा काढण्याचे ठरवण्यात आले आहे. या मोच्र्यात बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.  
एन. के. शोम म्हणाले, बँकांचा व्यवहार आणि शाखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही. बँकेचे व्यवस्थापन मात्र काही कामे खासगीकरणाच्या माध्यमातून करत असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करत आहे. भारतीय बँक संघाने मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. परिषद यशस्वी व्हावी, यासाठी सीटूचे प्रदेश सचिव अमृत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
या परिषदेत विविध बँकांचे अधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन एल.पी. नंदनवार यांनी तर ए.व्ही. डोंगरवार यांनी आभार मानले.