मुंबईसह आसपासच्या शहरांतील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वे कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाडय़ा सोडत असली, तरीही या गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येत नाही. आता उन्हाळी मोसमातील गर्दीला दिलासा देण्यासाठी ११ एप्रिलपासून आठवडय़ातून तीन वेळा कोकणात रवाना होणाऱ्या दादर-सावंतवाडी या गाडीलाही दिवा स्थानकात थांबा देण्यात आला नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
दिवा येथे थांबा नसल्याने बदलापूर, वसई, कल्याण, डोंबिवली, आसनगाव, टिटवाळा अशा ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना थेट ठाणे, दादर किंवा पनवेलपर्यंत प्रवास करून कोकणात जाणारी गाडी पकडण्याची धडपड करावी लागणार आहे.
कोकणात जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेपासून अगदी मध्य रेल्वेच्या प्रवासी संघटनेनेही अनेकदा केली आहे. दिवा रेल्वे स्थानकात गाडी थांबवताना मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेला त्याचा फटका बसत नाही.
या स्थानकात कोकणात जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी वेगळा प्लॅटफॉर्म आणि वेगळी मार्गिकाही आहे. त्यामुळे लांबपल्ल्याच्या गाडय़ा येथे थांबू शकतात. सध्या चालवण्यात येणारी दादर-रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर गाडी अनेकदा दिवा स्थानकातच रद्द करून पुन्हा रत्नागिरीकडे वळवली जाते.
त्या वेळी मध्य रेल्वे सोयीस्करपणे दिवा स्थानकातील या फलाटाचा वापर करते, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
कोकणात जाण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कल्याण, डोंबिवली, वसई अशा अनेक ठिकाणच्या प्रवाशांना ठाणे किंवा दादरपेक्षा दिवा स्थानक जास्त सोयीचे आहे. मुलुंड, विक्रोळी, भांडुप आणि ठाणे येथे राहणारे प्रवासी ठाण्यात गर्दी करतात.
त्यात कल्याणकडील प्रवाशांची भर पडल्यावर ठाणे स्थानकात कोकणात जाणाऱ्या गाडय़ांसाठी अभूतपूर्व गर्दी लोटते. ही गर्दी टाळण्यासाठी दिवा स्थानकातील थांबा हा उत्तम उपाय असताना आणि त्यासाठी फार काही कष्ट करावे लागणार नसतानाही रेल्वेतर्फे हा पर्याय नेहमीच डावलण्यात येत आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील बहुतांश रेल्वेगाडय़ांना दिव्यात थांबा द्यावा, या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेसह इतर प्रवासी संघटनांनीही थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापकांपासून सर्वाशी पत्रव्यवहार केला आहे.
नवी गाडी जाहीर केल्यास त्या गाडीला दिवा स्थानकात थांबा देण्यात येईल, अशा आश्वासनांवर या संघटनांची बोळवण दर वेळी केली जाते. ११ एप्रिल ते ८ जून या कालावधीत दादर-सावंतवाडी या विशेष गाडीच्या ५२ फेऱ्या चालणार आहेत.
मात्र या गाडीलाही दिवा स्थानकात थांबा दिला नसल्याने प्रवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण असून याचा निषेध करण्यात येईल, असे प्रवासी संघटनेचे प्रवक्ते नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.