केंद्रीय होमिओपॅथी परिषदेवर महाराष्ट्रातून पाच उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यासाठी चार पॅनलचे एकूण २९ उमेदवार रिंगणात आहेत. हे चारही पॅनल मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असून परिषदेवर कुणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय होमिओपॅथी परिषदेवर (सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी) संपूर्ण देशातून ५४ सदस्य निवडून द्यावयाचे असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या परिषदेवर महाराष्ट्रातून ३८ हजार ८०० नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टर्स ५ उमेदवारांना निवडून देणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील चार संघटनांचे २९ उमेदवार रिंगणात आहेत. या चारही संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांकडे मतपत्रिका पाठवली आहे. मतदान करून या मतदान पत्रिका ३१ जानेवारी २०१५ पूर्वी मुंबई येथील कार्यालयात पाठवणे आवश्यक आहे. काही मतदारांनी मतदान करून या पत्रिका मुंबईकडे टपालाद्वारे रवाना केल्या आहेत. १ ते २ फेब्रुवारीला मतदान पत्राची पडताळणी होईल. यानंतर ३ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. यावेळी सर्वच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
विदर्भात ६ हजार ८०० तर एकटय़ा नागपूरमध्ये १ हजार ५०० मतदार आहेत. निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश असे पाच विभाग पाडण्यात आले असून प्रत्येक पक्षाने विभाग प्रमुखांची नियुक्ती केली आहे. हे विभाग प्रमुख मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन व संपर्क साधून आपल्याच उमेदवारांना मतदान करण्याचा आग्रह धरत आहेत. केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची दर पाच वर्षांनी निवडणूक होते. महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी डॉक्टर्स अन्याय निवारण संघर्ष समिती, परिवर्तन पॅनल, जनरल प्रॅक्टीशनर पॅनल आणि कृती समिती पॅनल अशा चार संघटना रिंगणात आहेत.
होमिओपॅथीक इंटीग्रेटेड मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन ही डॉक्टरांची नोंदणीकृत संघटना (हिम्पाम) होमिओपॅथी डॉक्टर्स अन्याय निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून रिंगणात आहेत. या संघटनेचे डॉ. अरुणकुमार भस्मे (बीड), डॉ. दयाराम चौधरी (नागपूर), डॉ. शांतीलाल देसरडा (औरंगाबाद), डॉ. शिवदास भोसले (मुंबई) आणि डॉ. रवींद्र भोसले (सातारा) या पाच उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय होमिओपॅथी परिषद होमिओपॅथी डॉक्टरांच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप ठरवणे, नवीन महाविद्यालयांना परवानगी देणे, जुन्या नव्या महाविद्यालयांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या विकासासाठी धोरण ठरवणे, आदी कामे पार पाडते. नागपुरातून डॉ. मनीष पाटील आणि अकोला येथील डॉ. किशोर मालोकर हे सुद्धा रिंगणात होते. परंतु त्यांनी होमिओपॅथी डॉक्टर्स अन्याय निवारण संघर्ष समितीला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती समितीचे विदर्भ निवडणूक प्रचार प्रमुख डॉ. सुभाष राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.