ते आले.. त्यांनी पाहिलं.. अन् ते गेले.. अशी स्थिती मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पाहणी दौ-याची बुधवारी मिरज, सांगलीत झाली. वार्षकि पाहणीसाठी आलेल्या महाव्यवस्थापकांना विविध मागण्यांसाठी आणि रेल्वे स्थानकावरील अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी जमलेल्या प्रवासी संघटनांना कोणताही दिलासा अथवा आश्वासन न देता अवघ्या १०-१० मिनिटांच्या पाहणीत त्यांनी काय पाहिले? त्रुटी आढळल्या का? सूचना काय दिल्या? या गोष्टी गुलदस्त्यातच राहिल्या.
मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद हे आपल्या कर्मचा-यांच्या ताफ्यासह विशेष रेल्वेने मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकांची पाहणी करण्यासाठी बुधवारी आले होते. एरवी गचाळपणाचा कळस असणारी रेल्वे स्थानके महाप्रबंधकांच्या दौ-याच्या पाश्र्वभूमीवर चकाचक करण्यात आली होती. मध्यरेल्वेच्या जनसंपर्क अधिका-यांनीही महाप्रबंधक प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींशी भेटून अडचणी समजून घेणार असल्याचे सूतोवाच करीत प्रसिद्धी माध्यमांनाही भेटणार असल्याचे सांगितले होते.
पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणा-या मिरज स्थानकावर महाप्रबंधक जास्त काळ देतील अशी अपेक्षा ठेवून स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. रेल्वे कृती समिती, रेल्वे प्रवासी संघटना, शिवसेना प्रवासी संघटना आदी संघटनांनी महाप्रबंधकांना निवेदने देण्याची तयारी केली होती. मिरज स्वतंत्र विभाग करावा, सोलापूरसाठी असणा-या एक्स्प्रेस गाडीची वेळ पूर्ववत सकाळची करावी, पंढरपूर एक्स्प्रेस पॅसेंजर करावी, कोल्हापूर-मिरज पॅसेंजर किर्लोस्करवाडी पर्यंत सोडावी आदी मागण्या प्रवासी संघटना महाप्रबंधकांकडे करण्याच्या तयारीत होत्या. मात्र अन्य अधिका-यानी हे निवेदन स्वीकारुन संघटनांची बोळवण केली. या घटनेचा सर्वच प्रवासी संघटनांनी तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.
रेल्वे कृती समितीच्या वतीने अध्यक्ष मकरंद देशपांडे, सचिव जे.ए.पाटील, सहसचिव सुकुमार पाटील, प्रकाश इनामदार, सुनील खाडीलकर, प्रमोद इनामदार, मध्यरेल्वे प्रवासी सेनेच्यावतीने नंदकुमार गौड, तानाजी घारगे, शीतल पाटोळे, ज्ञानेश्वर पोतदार, चंद्रकांत मगुरे आदींनी विविध मागण्यांचे निवेदन या वेळी दिले.