यंदाच्या मोसमातील पहिल्याच पावसात मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुकीची पार दैना उडाली. एकीकडे पश्चिम रेल्वे थोडासा विलंब वगळता सुरळीत चालली असताना मध्य रेल्वेवर मात्र ठिकठिकाणी साचलेले पाणी, एकामागोमाग एक खोळंबलेल्या गाडय़ा, रुळांवरून चालणारे प्रवासी असेच चित्र दिसत होते. एवढय़ाश्या पावसाने पाणी कसे तुंबले, मध्य रेल्वे आणि पालिका यांनी केलेल्या नालेसफाईचे काय झाले, असे सर्वच प्रश्न बुधवारच्या पावसाने उभे केले. मात्र मध्य रेल्वेने या घटनेबाबत कारणांची जंत्रीच समोर ठेवली आहे. कारणे काहीही असली, तरी या निमित्ताने मध्य रेल्वेचे ढिसाळ नियोजन आणि अपयश पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.
*  पाऊस प्रचंड
मध्य रेल्वेकडून देण्यात आलेले पहिले कारण म्हणजे बुधवारी कुर्ला, घाटकोपर या भागात प्रचंड पाऊस झाला. थोडय़ाच वेळात पडलेल्या या प्रचंड पावसामुळे रुळांवर पाणी साठत गेले आणि त्यासाठीच्या यंत्रणा निकामी ठरल्या. मात्र सकाळपासून पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता पाऊस मुसळधार पडलाच नाही. मोठय़ा सरी येत असल्या, तरी त्या टप्प्याटप्प्यात येत होत्या. दोन सरींमधील काळात पाणी ओसरणे अपेक्षित असताना तसे घडले नाही. त्यामुळे ही पाणीकोंडी प्रचंड पावसामुळे झाल्याचा मध्य रेल्वेचा दावा पटण्यासारखा नाही.
* ब्राह्मणवाडी नाल्याचा वाटा मोठा!
कुर्ला पश्चिमेला असलेल्या ब्राह्मणवाडी येथील नाल्याचे काम एका विकासकाद्वारे करण्यात येत आहे. रुळांवर आलेल्या पाण्यामध्ये या ब्राह्मणवाडी नाल्यातून आलेल्या पाण्याचा वाटा खूपच मोठा असल्याचे सांगितले जात आहे. एवढय़ा कमी वेळात रुळांवर एवढय़ा जास्त प्रमाणात पाणी कुठून आले, याबाबत आता मध्य रेल्वे तपास करत आहे. त्यासाठी या नाल्याच्या कडेकडेने रेल्वे आपला कर्मचारी पाठवणार आहे. हा कर्मचारी पार नाल्यांच्या उगमस्थानापर्यंत जाऊन त्याबाबतचा अहवाल देणार आहे.
* विमानतळाजवळील नाले रुंद केल्याचा परिणाम?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अद्ययावत असे टर्मिनल-२ उभारताना विमानतळाजवळील नाले रुंद करण्यात आले. त्यामुळे या नाल्यांमधून गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणी वाहत कुल्र्याच्या दिशेने आले. मात्र कुल्र्याजवळील नाल्यांची क्षमता न वाढवल्याने हे सर्व पाणी रुळांवर साचत गेले, असे एक कारण पुढे केले जात आहे. रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांच्या मते, रुळांवर साचलेले पाणी खूप असले, तरी ते वाहते होते. मात्र त्या वाहत्या पाण्यात पुन्हा पुन्हा भर पडत असल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. परिणामी पाणी कायम राहिले.
* सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचे बांधकाम
सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यासाठी मोठमोठे खांब, त्या खांबांसाठी पृष्ठभाग उभा केल्याने पाणी जास्त प्रमाणात साचल्याचा एक शोधही रेल्वेने लावला. कुर्ला भाग हा आधीच खोलगट असल्याने तेथे हमखास पाणी तुंबते. मात्र यंदा या जोडरस्त्याच्या कामाने त्यात भर टाकली. पण हा दावा एमएमआरडीए प्रशासनानेच फेटाळून लावला. जोडरस्त्याचे काम करताना कोणत्याही नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण केलेला नाही. कुर्ला परिसर हा सखल असल्याने या ठिकाणी रेल्वेने अधिक काळजी घेणे गरजेचे होते. त्याऐवजी रेल्वे इतर संस्थांवर ठपका ठेवत असेल, तर ते चूक आहे, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.