दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेच्या घेतलेल्या रेल्वेगाडय़ा परत कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे (सीआरएमएस) द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.
आधी मध्य रेल्वेतर्फे छिंदवाडा-आमला मार्गावर संचालित करण्यात येणाऱ्या चार पॅसेंजर गाडय़ा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने ताब्यात घेतल्या. या गाडय़ांच्या बदल्यात नागपूरपासून गोंदियापर्यंत वाढवण्यात आलेल्या विदर्भ एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन गाडय़ांसह एकूण चार गाडय़ा मध्य रेल्वेला सोपवण्याचे आश्वासन दपूम रेल्वेने मध्य रेल्वेला दिले होते. परंतु आता ते या गाडय़ा मध्य रेल्वेला सोपवण्यास नकार देत असून हा मुद्दा दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. विदर्भ आणि महाराष्ट्र या गाडय़ा २१ जानेवारीपर्यंत मध्य रेल्वेला न सोपवण्यात आल्यास छिंदवाडा क्षेत्रातील चार गाडय़ांवर कब्जा करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. नागपूर विभागात सहायक लोको पायलटची पदे रिक्त असताना या विभागातील १२५ कर्मचारी इतर विभागात पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे भुसावळ, सोलापूर व पुणे विभागात कार्यरत असलेल्या सहायक लोको पायलटना ३१ मार्चपर्यंत बोलावण्याची मागणी संघटनेने केली. रेल्वे प्रशासनाचा असा कुठलाही नियम नसतान लोको पायलट आणि गार्ड यांच्यासाठी कॉमन लाईन बॉक्स तयार करण्यात आले. या लाईन बॉक्समध्ये अनेक त्रुटी असून त्या दूर करण्यात याव्या, अशीही मागणी संघटनेने केली.
या द्वारसभेनंतर रेल्वे प्रशासन आणि संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक जयदीप गुप्ता, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नामदेव रबडे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक सत्येंद्र कुमार, एन.एस. काझी आणि सीआरएमसचे आर.एन. चांदुरकर, विनोद चतुर्वेदी, के.पी. सिंग, मिलिंद पाठक, एम.के. सिंह, देवाशीष भट्टाचार्य इ. सहभागी झाले होते.