शतकातील सर्वात मोठा आणि चंद्रासारखा प्रकाशमान दिसणारा ’आयसॉन धूमकेतू’ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१३ महिन्यात दिसणार आहे. शास्त्रीय भाषेत सी/२०१२ एस-१ नावाचा हा धूमकेतू नेवेस्की नोवीचोनोक धूमकेतू म्हणूनही ओळखला जातो. इंटरनॅशनल सायंटिफीक ऑप्टीलक नेटवर्क या वेधशाळेच्या माध्यमाने शोधल्यामुळे त्याला आयसॉन हे नाव पडले. सध्या आयसॉन धूमकेतू पहाटेला दुर्बिणीच्या किंवा द्विनेत्रीच्या माध्यमाने दिसत असून तो साध्या डोळय़ाने नोव्हेंबर महिन्यापासून दिसणार आहे.
आयसॉन धुमकेतू २४ सप्टेंबर २०१२ रोजी रशियन खगोल शास्त्रज्ञ वैज्ञानिक नेवेस्की व नोविचोनोक यांनी १६ इंचाच्या रिफ्लेक्टर दुर्बिणीने शोधला आणि हा धुमकेतू इंटरनॅशनल सायंटिफीक ऑप्टिलक नेटवर्क या संस्थेमार्फत शोधल्यामुळे त्याला आयएसओएन हे नाव पडले. शतकातील सर्वात तेजस्वी धूमकेतू म्हणून आयसॉनकडे बघितले जाते. त्याची प्रखरता चंद्रासारखी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या धूमकेतूचा गाभा ५ कि. मी. व्यासाचा असून ऊर्ट क्लाऊड या भागातून आला आहे. सूर्याच्या एकदम जवळून जाणार असल्यामुळे सूर्यावर आदळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
येत्या १ ऑक्टोबर रोजी धूमकेतू मंगळ ग्रहाजवळून जाईल आणि २६ डिसेंबरला पृथ्वीपासून ६४,२००,००० कि. मी. अंतरावरून जाईल. २४ नोव्हेंबरला तो सूर्याजवळ असेल जर तो सूर्यावर आदळला नाही तर तो पुढे तो पश्चिम आकाशातील सर्वात तेजस्वी धूमकेतू म्हणून दिसू लागेल. १४ जानेवारीला पृथ्वी या धुमकेतूच्या कक्षेजवळून जाईल तेव्हा उल्का वर्षांवाची शक्यता असेल.
ऑक्टोबर महिन्यात आयसॉन धूमकेतू सिंह राशीत रेग्युलस हा ताऱ्याजवळून जाईल. ऑक्टोबरच्या शेवटी तो मंगळ ग्रहाजवळून जाईल. नोव्हेंबर महिन्यात तो तेजस्वी दिसेल तेव्हा तो कन्या राशीत स्पाइका या तेजस्वी ताऱ्याजवळ दिसेल.
नोव्हेंबर नंतर तो पश्चिम आकाशात शनी ग्रहाजवळ दिसू लागेल. २८ नोव्हेंबरला तो जास्त तेजस्वी दिसेल. तो खरोखर चंद्राइतका तेजस्वी दिसेल किंवा नाही याबद्दल दुमत असले तरी तो शुक्रा ग्रहाएवढा तेजस्वी नक्कीच दिसणार आहे. डिसेंबर महिन्यात धूमकेतू उत्तर गोलार्धात तर ८ जानेवारीला ध्रुवताऱ्याजवळ दिसेल. येत्या महिन्यात दुर्बिनीने पाहिल्यास धुमकेतूचा गाभा, कोमा व शेवटी स्पष्टपणे दिसेल.
स्काय वॉच ग्रुपतर्फे विदर्भात धुमकेतू निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. शतकातील सर्वात तेजस्वी धूमकेतूला पाहण्याची संधी खगोलप्रेमींनी सोडू नये, असे आवाहन सेंट्रल इंडिया स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी केले आहे.