अंगणवाडी कर्मचा-यांच्या आंदोलनाबाबत अकोल्याच्या सभापतींनी केलेल्या कथित हेटाळणीयुक्त वक्तव्याचा मार्क्‍सवादी किसान सभेने निषेध केला आहे. सभापतींची खुर्ची रस्त्यावर आणत खुर्चीभोवती निषेधाच्या घोषणा देत या वक्तव्याचा आंदोलकांनी धिक्कार केला.
अंगणवाडी कर्मचा-यांचा दि. ६ जानेवारीपासून बेमुदत संप सुरू आहे. या संपाची शासनाने दखल न घेतल्याने सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी संघटनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. अकोले पंचायत समिती कार्यालयासमोरही उपोषण सुरू आहे. सभापती अंजना बोंबले यांनी सोमवारी उपोषणाला भेट दिली, त्या वेळी त्यांनी या आंदोलनाबाबत िनदनीय टिप्पणी केल्याचा संघटनेचा आरोप आहे. जनतेला उंदराची उपमा देत सत्ताधाऱ्यांना त्यांनी हत्ती संबोधले. अशी मल्लिनाथी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. मार्क्‍सवादी किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी घोषणा देत पंचायत समिती कार्यालयाला धडक दिली. सभापतींच्या दालनात घुसून त्यांची खुर्चीच त्यांनी रस्त्यावर आणली. त्याभोवती उभे राहात कार्यकर्त्यांनी धिक्काराच्या घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.
किसान सभेच्या शिबिरासाठी अकोल्यात आलेले मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. अशोक ढवळे यांनीही सभापतींच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. या संपाबाबत दोन दिवसांत तोडगा न निघल्यास संपूर्ण राज्यभर किसान सभा रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार गणेश ताजणे यांनी व्यक्त केला. डॉ. अजित नवले, तुळशीराम कातोरे, ज्ञानेश्वर काकड यांनीही या वेळी मनोगते व्यक्त केली. सभापती बोंबले यांनी आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला असल्याचे सांगितले. आंदोलनाबद्दल आपल्याला सहानुभूती असून, आपण आंदोलनाची हेटाळणी करणारे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे त्या म्हणाल्या.