वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या अनेक सण, सभारंभांच्या महोत्सवांचे मुंबई, ठाणे, पुण्याचे अनुकरण करणाऱ्या नवी मुंबईत अलीकडे चैत्री नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. ऐरोली व वाशी येथे असे दोन नवरात्रोत्सव साजरे होत आहेत. या नवत्रोत्सवांची उपासना अश्विन शुक्ल महिन्यात होणाऱ्या नवरात्रोत्सवासारखीच केली जात असून या काळात नऊ दिवस निरंकार उपवास करण्याची पद्धतही अवलंबिली जात आहे. या नवरात्रोत्सवांचा फार असा बोलबाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या दप्तरी अशा नवरात्रोत्सवांची नोंददेखील झाली नसल्याचे नवी मुंंबई पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेने स्पष्ट केले.
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या धर्मवीर आनंद प्रतिष्ठानच्या वतीने गेली १३ वर्षे हा चैत्री नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. त्याची चाहूल नवी मुंबईकरांनाही हळूहळू लागत असून वाशी येथील भारतीय आध्यात्मिक दर्शन सेवा केंद्र यांच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. सकाळी सात ते दुपापर्यंत देवीची पूजाअर्चा या ठिकाणी केली जाते. नवरात्रोत्सवात मांडण्यात येणारी घटस्थापना या ठिकाणी केली जाते. वाशीनंतर ऐरोली येथील जय भवानी जेष्ठ नागरिक सेवा संस्था या संस्थेच्या वतीने गेली दोन वर्षे हा नवरात्रोत्सव साजरा केला जात असून यात ३५० ज्येष्ठ नागरिक भाग घेत आहेत. तेच या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन करतात. या नऊ दिवसांत एखाद्या तरुणाला लाजवेल अशा आविर्भावात ही मंडळी काम करीत असून चित्रकला, निबंध स्पर्धाचेदेखील आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, हरिपाठ हे आध्यात्मिक कार्यक्रम अविभाज्य घटक असतो. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक सक्रिय होत असल्याचे अध्यक्ष सोपान माने यांनी सांगितले. होमहवन, मंत्र, जप यांचे विधिवत पूजन या काळात केले जात असून आजूबाजूच्या नागरिकांची दर्शनासाठी चांगलीच गर्दी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या या उपक्रमाला आम्ही तरुण मंडळी नेहमीच साथ देत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रावराणे यांनी स्पष्ट केले.
विकास महाडिक, नवी मुंबई