नववर्षांच्या पूर्वसंध्येला दयानंद सभागृहात आयोजित चैत्रपल्लवीचा तपपूर्ती सोहळा विविध लोककलांच्या सादरीकरणाने उत्साहात पार पडला.
पोलीस उपअधीक्षक तिरुपती काकडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी रमेश बियाणी होते. उपजिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, जोगेंद्रसिंह बिसेन आदी या वेळी उपस्थित होते. शरद पाडे यांनी शिवरायांची आरती सादर केली. पलक कामदारने उत्कृष्ट भरतनाटय़म सादर केले. जवाहर नवोदय विद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्य परंपरेवर आधारित नृत्यनाटिका सादर केली. प्रतीक्षा व तितिक्षा राजमाने यांनी लावणी व भरनाटय़म् यांची उत्कृष्ट जुगलबंदी सादर केली. स्नेहा शिंदेने ‘अप्सरा आली’ ही लावणी सादर केली. ज्ञानेश्वर जवळे याने स्त्रीभ्रूणहत्येवरील भारूड सादर केले. वैभव माने याने गोंधळ, संतोष माने याने पोवाडा सादर केले. दयानंद कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पंजाबी गिद्दा सादर केली. नीलेश पाठक, विशाल सोमवंशी, तेजस धुमाळ यांनी लोकवृंदवादन सादर केले. देवेंद्र कुलकर्णी यांच्या वंदे मातरम्ने सांगता झाली. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी प्रास्ताविक, तर प्रा. संदीप जगदाळे व मेघा पंडित यांनी सूत्रसंचालन केले.