खडू-फळा हे समीकरण शिक्षक-विद्यार्थ्यांच्या पाचवीला पुजलेले असतात. पदवी घेऊन विद्यार्थी शिक्षणाच्या चाकोरीतून बाहेर पडला तरी शिक्षकांना मात्र कायमच या समीकरणाला चिकटून रहावे लागते. अनेकदा फळ्यावर लिहिलेले पुसताना खडूचे धुलिकण नाका-तोंडात जाऊन शिक्षकांना श्वसनाचे विकारही जडतात. पहिल्या रांगेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा त्रास होतो. खडूच्या या धुलिकणांमुळे अनेकदा आरोग्याच्या गंभीर समस्याही उद्भवतात. मात्र, आता यावर मुंबईतील एका शिक्षकाने उपाय शोधला आहे, ‘चॉक डस्ट ऑन डस्टर रिमूव्हर’ या यंत्राची निर्मिती करून!
ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक दीपक साबळे यांनी हे यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे फळा पुसताना उडणारे खडूचे धुलिकण शिक्षक वा विद्यार्थ्यांच्या नाकातोंडात न जाता त्या यंत्रामध्येच जमा होण्याची सोय करण्यात आली आहे. यंत्रासाठी २०० ते २५० व्होल्टचे मशिन वापरण्यात आले आहे. हे मशिन वायरीद्वारे चालू-बंद करता येईल अशा बटनाला जोडलेले असते. हे मशिन किसणीसारख्या खडबडीत पृष्ठभाग असलेल्या ‘फ्लेक्झिबिलिटी फिक्सिटी’ला जोडलेले असते. या ‘फ्लेक्झिबिलिटी फिक्सिटी’मध्ये सर्वप्रथम शिक्षकांना डस्टर अडकवावा लागतो. त्यानंतर बटनाच्या सहाय्याने हे यंत्र सुरू केल्यानंतर ते ‘फ्लेक्झिबिलिटी फिक्सिटी’च्या मदतीने डस्टरने विलग केलेले खडूचे धुलिकण जमा करते. ‘फ्लेक्झिबिलिटी फिक्सिटी’च्या पृष्ठभागावर असलेल्या छिद्रांमुळे हे कण खाली न पडता त्याखाली असलेल्या बॉक्समध्ये जमा होतात. परिणामी ते शिक्षक किंवा विद्यार्थ्यांच्या नाकातोंडात जात नाहीत.