शहरातील प्रभाग १५ अ (अनुसूचित जमाती महिला) या राखीव जागेवरून विजयी झालेल्या अपक्ष उमेदवार अनिता गोरक्षनाथ भोसले यांची निवड रद्द ठरवावी या मागणीसाठी पराभूत उमेदवार किरण दयानंद उनवणे यांनी येथील न्यायालयात दावा दाखल केला आहे. यासंदर्भात भोसले यांना म्हणणे मांडण्यासाठी ७ फेब्रुवारीला हजर राहण्याची नोटीस न्यायालयाने काढली आहे.
वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी हा आदेश दिला. उनवणे यांच्या वतीने वकील विनायक सांगळे काम पाहात आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत १५ अ मधून भोसले विजयी झाल्या. ही जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होती. परंतु भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जातीचे बनावट दाखले दिल्याची हरकत उनवणे यांनी घेतली आहे.
भोसले यांचे माहेरचे नाव अनिता मधुकर मिसाळ आहे, त्यांनी जातीचा दाखला म्हणून जो शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे, त्या महात्मा गांधी विद्यालय (अंबरनाथ, ठाणे) शाळेच्या दाखल्यावर केवळ हिंदू असल्याचा उल्लेख आहे. भोसले यांनी हिंदू मांग असा खोटा दाखला सादर केला, नाशिकच्या जातपडताळणी विभागाच्या दक्षता पथकाने शाळेकडे कोणतीही पडताळणी केली नाही, भोसले यांचे बंधू महेंद्र यांच्या शाळा (महंत कमलदास विद्या मंदिर, कल्याण) सोडल्याच्या दाखल्यावरही केवळ हिंदू असाच उल्लेख आहे. परंतु भोसले यांनी हिंदू मांग असा खोटा दाखला सादर केला. त्यांनी वडिलांचाही ठाणे येथे अस्तित्वात नसलेल्या शाळेचा बोगस दाखला दिल्याचा दावा न्यायालयापुढे सादर केलेल्या दाव्यात केल्याचे अ‍ॅड. सांगळे यांनी सांगितले.