पालखेड कालव्यातून देण्यात येणारे पाण्याचे आ़वर्तन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये महसूल आयुक्तांनी अडवून धरल्याने मनमाड रेल्वे, येवल्यासह ३८ गावात गंभीर पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. मनमाडला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणात जेमतेम तीन दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. रेल्वे स्थानकात तर पाणीच नसल्यासारखी स्थिती आहे.
पावसाळा सुरू होईपर्यंत मनमाडची तहान भागविण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी स्थिती आहे. त्यातच शनिवारी झालेल्या आयुक्तांच्या बैठकीत पालखेड कालव्यातून पाणी सोडण्यासंदर्भात कोणताच निर्णय न झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
पालखेडचे पाणी २६ एप्रिलला सोडण्यात येणार होते. परंतु  जायकवाडीला पाणी सोडण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पालखेडच्या पाण्यासंदर्भातील निर्णय  रोखून धरला.
 मनमाड रेल्वे स्थानकात पाणी नसल्याने येथील टंचाईची वार्ता संपूर्ण देशात पसरली आहे. दररोज सुमारे ६० गाडय़ांमधून २५ हजार प्रवाशांची ये-जा होणाऱ्या मनमाड रेल्वे स्थानकात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने प्रवाशांची तहान भागणे मुश्किल झाले आहे. त्यातच रेल्वे गाडय़ांची सफाई यंत्रणा कोसळली आहे.
डब्यांमधील शौचालये व बेसिनमध्ये पाणी नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पंचवटी, राज्यराणी व गोदावरी या सुपरफास्ट गाडय़ांच्या डब्यांमध्ये मनमाडऐवजी मुंबई सेंट्रल येथून पाणी भरण्यात यावे व स्वच्छता केली जावी, अशी मागणी प्रवासी संघटनेसह व्यापाऱ्यांनी केली आहे. मनमाडला सध्या २० दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी यापुढे फक्त तीन दिवस पुरेल इतपतच जलसाठा शिल्लक असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पालखेड व करंजवण धरणातील पाणी जायकवाडीला दिल्यास या भागातील टंचाईची परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे
दरम्यान येवला येथील पाणी पुरवठा आता आठ दिवसाआड झाला आहे. येवल्यासह ३८ गावांसाठी जेमतेम १५ दिवस पुरेल इतकेच पाणी तलावात शिल्लक राहिल्याने या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पावसाळ्यास अद्याप दीड महिना बाकी असल्याने तोपर्यंत मनमाड व येवला या दोन शहरांना पाणी पुरविण्याचे आव्हान प्रशासनापुढे असून तूर्तास टँकरवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे.