लोकांना स्वप्ने पाहायला लावून ती प्रत्यक्षात उतरवण्याचे कसब विलासराव देशमुख यांच्यात होते. त्यांनी लातूर व महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न साकारण्याचे आपणा सर्वासमोरील आव्हान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी केले.
विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विलासराव देशमुख सेंटरतर्फे द्वादशीवार यांचे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. आमदार दिलीपराव देशमुख, खासदार जयवंत आवळे, आमदार अमित देशमुख व वैजनाथ िशदे, जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, रीतेश देशमुख, धीरज देशमुख यांची उपस्थिती होती. द्वादशीवार म्हणाले, की विलासरावांना केवळ राजमान्यताच नव्हे, तर लोकमान्यता अधिक होती. राज्यात त्यांच्यापूर्वी जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या पाठीशी कोणा ना कोणाचा तरी वरदहस्त होता. कोणाचाही वरदहस्त नाही, घराण्याचा राजकीय वारसा नाही, अशा स्थितीत बाभळगावचे सरपंच ते मुख्यमंत्री, पुढे केंद्रीयमंत्री या पदापर्यंत त्यांनी वाटचाल केली. ते स्वयंभू नेते होते. मराठी, िहदी, इंग्रजी तिन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. सतत वाचनातून त्यांनी भाषेची उपासना केली. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात एकात्मता, बंधुभाव व सर्वधर्मसमभाव वाढीस लागला.
सन १९९५मध्ये देशाचे उत्पन्न होते, तेवढे २०१०मध्ये केवळ महाराष्ट्राचे होते. या कालावधीत ९ वष्रे विलासराव मुख्यमंत्री होते. त्यामुळे विकासाचे श्रेय विलासरावांकडे जाते. लोकांचे प्रश्न ऐकून घेण्याची त्यांची सवय विलक्षण होती. साधा असलेला हा अतिशय मोठा माणूस होता, या शब्दांत त्यांनी गौरव केला. गेल्या वर्षभरात महाराष्ट्र काँग्रेसला विलासरावांचा पर्याय शोधता आला नाही. राज्यातील सर्व भागांत लोकप्रिय असणारा व ज्यांच्या सभांना हजारोंचा जनसमुदाय उपस्थित राहायचा, असा एकमेव नेता म्हणून विलासरावांचा उल्लेख करावा लागेल. विलासरावांमुळेच मुख्यमंत्रिपदाचा मान वाढला, पत वाढली. हा वारसा लातूरकरांनी जपला व वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अॅड. त्र्यंबकदास झंवर यांनी प्रास्ताविक केले. मंत्री पाटील यांनी विलासराव देशमुख आभाळाएवढे नेतृत्व होते. त्यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याची गरज व्यक्त केली. खासदार आवळे यांचेही भाषण झाले. बाळकृष्ण धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. व्यंकट बेद्रे यांनी आभार मानले.