डान्स बारची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे छमछम आता पुन्हा जोरात घुमू लागणार असल्याचे स्पष्ट आहे. पनवेलमधील वाढत्या डान्स बारमुळे डान्स बारबंदीचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. पनवेलमधील जुन्या मुंबई-पुणे मार्गावर आजही डान्स बारची मालिका तशीच असून छमछम बंद झाल्यानंतरही ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ते रात्रभर चालत होते. आता त्या ठिकाणी पुन्हा छमछम सुरू होणार आहे.नवी मुंबई, पनवेल भागात डान्स बारची संख्या जास्त होती. त्यामुळेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वर्णी लागावी म्हणून काही पोलीस अधिकारी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत होते. डान्स बार आणि पेट्रोल-डिझेलची वरकमाई या मुळेच नवी मुंबई पोलीस दलाला मागणी होती. पनवेलमध्ये तर या डान्स बारने कहर केला होता. त्यामुळे तरुणाई हाताबाहेर गेल्याची अनेक उदाहरणे लोकप्रतिनिधींनी दिली आहेत. साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मिळालेले भूखंड विकून आलेल्या गडगंज पैशापायी ही तरुण पिढी बरबाद होत होती. त्यात काही प्रकल्पग्रस्तही आहेत. त्यामुळे तरुणाईला बरबाद करणारे हे डान्स बार बंद करण्यात यावेत अशी पहिली मागणी पनवेलमधून सुरू झाली. त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे बार पुन्हा सुरू होणार या भीतीने पनवेलकरांच्या पोटात गोळा आला आहे. डान्स बार बंद झाल्यानंतर ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ते बार रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहत होते. यात पनवेलमधील कपल बार स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने रात्रभर सुरू होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना विश्वासात न घेता ठाणे ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून या बारमधून सव्वा करोड रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. डान्स बार सुरू झाल्याने ऑर्केस्ट्राच्या जागी बार गर्ल नाचणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई, पनवेलमधील दौलतजादाला पुन्हा ऊत येणार आहे. डान्स बार बंद झाल्यानंतर अनेक मुलींनी दुबईचा रस्ता पकडला होता. बार सुरू होणार असल्याने या मुलींच्या परतीचा मार्गदेखील मोकळा झाला आहे.
डान्स बार झोनची मागणी
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक डान्स बार भरवस्तीत आहेत. त्यामुळे मध्यरात्रभर सुरू असणाऱ्या या डान्स बारमुळे त्यातील दणदणाटामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत असतो. त्यामुळे हे डान्स बार शहराच्या बाहेर नेऊन तेथे डान्स बार झोन तयार करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.