सोलापूर महापालिका परिवहन समितीच्या सभापतिपदाची निवडणूक उद्या मंगळवारी होणार आहे. या पदासाठी सत्ताधारी काँग्रेसने माजी नगरसेवक सुभाष चंद्राम चव्हाण यांना संधी दिली आहे.
परिवहन समितीचे सभापती मल्लेश बडगू (राष्ट्रवादी) यांची मुदत उद्या मंगळवारी संपणार आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. महापालिकेच्या सत्ताकारणातील करारानुसार परिवहन सभापतिपद पाच वर्षांपैकी तीन वर्षे काँग्रेसने तर दोन वर्षे राष्ट्रवादीने सांभाळावयाचे आहे. काँग्रेसने सुभाष चव्हाण यांना उमेदवारी दिली असून त्याप्रमाणे दुपारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांच्या विरोधात भाजपचे श्रीनिवास दायमा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. १२ सदस्यांच्या परिवहन समितीमध्ये काँग्रेसचे ५ व राष्ट्रवादीचे २ याप्रमाणे बहुमत आहे. तर भाजपचे ४ व माकपचा १ याप्रमाणे संख्याबळ आहे.