जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रातही ग्रामीण भागातील मुलांना नावलौकिकाची संधी आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कराडच्या डीलक्स क्लबचा अष्टपैलू खेळाडू ऋषिकेश राजेश पाटील याची महाराष्ट्राच्या वर्षांखालील क्रिकेट संघात झालेली निवड असल्याचे पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या १६ वर्षांंखालील संघात निवड झाल्याबद्दल ऋषिकेश राजेश पाटील-वाठारकर याचा पाटण स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पाटण येथे आमदार पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कराड जनता उद्योग समूहाचे शिल्पकार विलासराव पाटील-वाठारकर, पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, नाना क्षीरसागर, कराड जनता बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपकसिंह पाटणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारात चांगले नाव कमावून करीअर करण्याची संधी ग्रामीण भागातील मुलांनाही आहे ही प्रेरणा ऋषिकेश पाटील याच्या उदयोन्मुख खेळाडूंनी घ्यावी असे आवाहन युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले. महाराष्ट्राच्या संघासाठी विदर्भातील अकोला येथे शालेय क्रिकेट विनू मंकड क्रीडा स्पध्रेसाठी निवड होणारा तो सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव खेळाडू असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.