जागावटपाच्या तडोजोडीत रामटेक लोकसभा मतदारसंघात स्वत:चा उमेदवार उभा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने महायुतीतील आठवल गट नाराज झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाच्या वाटय़ाला यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी वेळोवेळी केली होती. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेने या मतदारसंघावरील हक्क कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही, असा पवित्रा घेतला असून गेल्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार कृपाल तुमाने यांच्या नावाचा पुन्हा विचार केल्याचे समजते. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, रामदास आठवले यांना येथून निवडणूक लढविण्याची इच्छा असून वाटाघाटी फिस्कटल्यास महायुतीचे राजकीय गणित धोक्यात येण्याची शक्यता आहे.  
महिनाभरापूर्वी रामटेकच्या जागेवरून शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर बैठक झाली होती. या बैठकीनंतर बंडू तागडे यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटविण्यात आले. या बैठकीत शिवसेनेची रणनिती ठरविणाऱ्या नेत्यांपैकी छोटू देसाई सहभागी झाले होते. रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित वर्गासाठी राखीव झाला आहे. गेल्यावेळी काँग्रेसने मुकुल वासनिक यांना येथून उमेदवारी देऊन शिवसेनेचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ खेचून आणला होता. परंतु, कृपाल तुमाने यांनी वासनिकांना जबरदस्त लढत दिली होती. अवघ्या १४ हजार मतांनी ते पराभूत झाले होते. विधानसभा मतदारसंघात आशिष जयस्वाल शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांची या मतदारसंघावर जबरदस्त पकड आहे. त्यामुळे यंदा ही जागा काँग्रेसकडून हिसकावून आणण्याची पुरेपूर तयारी शिवसेनेने केली असून कृपाल तुमाने यांचे नाव निश्चित केल्याचे समजते. एकेकाळी तुमाने काँग्रेस सेवादलाचे लढवय्ये कार्यकर्ते होते. त्यांना ऐनवेळी शिवसेनेत आणून उमेदवारी देण्यात आली होती.
काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांच्या वर्तुळात वावरणारे मुकुल वासनिक यांनाही काँग्रेसची उमेदवारी पुन्हा मिळण्याची शक्यता असल्याने त्यांनीही मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. हा मतदारसंघ माजी पंतप्रधान दिवं. पी.व्ही. नरससिंह राव यांचा चर्चित मतदारसंघ राहिलेला आहे. नरसिंह राव यांनी रामटेकचे प्रतिनिधीत्व केले होते. परंतु, कालांतराने शिवसेनेने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले. सलग दोनवेळा शिवसेनेचा उमेदवार येथून निवडून आला होता. शिवसेनेचे वर्चस्व पाहता ही जागा पदराा पाडून घेण्यासाठी रामदास आठवले इच्छुक असून त्यांनी प्रत्येकवेळी तसेच स्पष्टपणे जाहीर केले आहे. परंतु, शिवसेना या जागेवरील दावा सोडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगण्यात आले.
 शिवसेनेची उमेदवारी पुन्हा मिळण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांमध्ये अमरावतीचे आनंदराव अडसूळ, यवतमाळ-वाशीमच्या भावना गवळी यांचा समावेश असल्याचे समजते. यात कृपाल तुमानेंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.