27 November 2020

News Flash

चंद्रपुरातील बीअर बार व हॉटेल्सची कागदपत्रे गोळा करतांना दमछाक

शहरातील ८५ बीअर बार व हॉटेल्सपैकी केवळ दोन हॉटेलने व्यावसायिक बांधकामाची परवानगी, वाहनतळ, महानगरपालिका व अन्य विभागाचे नाहरकत

| January 1, 2014 08:42 am

शहरातील ८५ बीअर बार व हॉटेल्सपैकी केवळ दोन हॉटेलने व्यावसायिक बांधकामाची परवानगी, वाहनतळ, महानगरपालिका व अन्य विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र सादर केल्याने खाद्यगृह परवान्यासाठी त्यांची फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर पोहोचली आहे. इतर ८३ बीअर बार व हॉटेल व्यावसायिकांचीही कागदपत्रे गोळा करतांना दमछाक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, खाद्यगृह परवान्यासाठी व्यावसायिक बांधकाम व वाहनतळ आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या जिल्ह्य़ात ग्रामीण व महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३५० बीअर बार व हॉटेल्स आहेत, तर तेवढेच छोटे हॉटेल आहेत. या सर्व हॉटेलला जिल्हाधिकाऱ्यांनी खाद्यगृह परवान्यासाठी व्यावसायिक बांधकाम, वाहनतळ, तसेच महानगरपालिका व जिल्हा पोलीस दलाचे नाहरकत प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. या मुख्य कागदपत्रांसह शॉप अ‍ॅक्ट व इतर कागदपत्रेही मागितली आहेत. मात्र, चंद्रपुरातील बहुतांश बीअर बार व हॉटेल व्यावसायिकांकडे व्यावसायिक बांधकाम, वाहनतळ नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानगरपालिका क्षेत्र व ग्रामीण खाद्यगृहधारकांनी तीन दिवसात खाद्यगृह परवान्याचे नूतनीकरण करावे अन्यथा, कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. महानगरपालिका क्षेत्रांतर्गत, तसेच ग्रामीण व शहरी भागातील खाद्यगृहधारकांनी परवाने प्राप्त केलेले नसतील, तसेच खाद्यगृह परवाने नूतनीकरण केले नसतील, अशा खाद्यगृहधारकांनी आपले खाद्यगृहाचे परवाने प्राप्त करण्याकरिता तसेच खाद्यगृह परवान्याचे नूतनीकरण संबंधाचे तीन दिवसाचे आत आवश्यक कागदपत्रासह चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत खाद्यगृहधारक जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच ग्रामीण व शहरी भागातील खाद्यगृहधारक तेथील संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करतील.
ज्या खाद्यगृहांना नोटीस मिळाले नसतील त्यांनीही आवश्यक कागदपत्रांसह खाद्यगृह परवाना प्राप्त करण्याकरिता, तसेच नूतनीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अर्ज करतील. जे खाद्यगृहधारक याबाबत संबंधित कार्यालयाकडे अर्ज सादर करणार नाहीत त्यांच्याविरुध्द मुंबई पोलीस अधिनियमनुसार कायदेशीर कार्यवाहीस संबंधित खाद्यगृहधारक पात्र ठरतील. तसेच विनापरवाना खाद्यगृह चालू ठेवण्यास वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी कळविले आहे. जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आज खाद्यगृह परवान्याचा शेवटचा दिवस आहे. ग्रामीण भाग वगळता चंद्रपूर शहरात एकूण ८५ बीयर बार व हॉटेल्स आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आतापर्यंत ४० हॉटेल व बीअर बार व्यावसायिकांनी खाद्यगृह परवाना मिळावा म्हणून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केलेला आहे, तर ४५ हॉटेल मालक कागदपत्रे तयार करण्यात गुंतलेले आहेत. त्यातही व्हेज जंक्शन व पॅराडाईज या दोन हॉटेलनी कागदपत्रांची पूर्तता केलेली असल्याने खाद्यगृह परवान्यासाठी त्यांची फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर पाठविण्यात आलेली आहे, तर उर्वरीत एकाही हॉटेलने कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खाद्यगृह परवान्यासाठी ४००, तर बीअर बारसाठी ५०० रुपये फी आकारण्यात येत आहे, तसेच वाहनतळासाठी मनपा व ग्रामीण भागात ग्राम पंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र मागितले आहे. मात्र, शहरातील बहुतांश बीअर बारला वाहनतळ नाही. त्यामुळे त्यांना खाद्यगृह परवाना मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाहनतळ व व्यावसायिक बांधकामाची अट शिथील करण्याची विनंती केली होती. त्यानंतर महापौर संगीता अमृतकर व सभापती, तसेच काही नगरसेवकांनीही याच मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मात्र, अट शिथिल करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2014 8:42 am

Web Title: chandrapur beer bar hotels
टॅग Hotels
Next Stories
1 बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू शासनाने खरेदी कराव्यात -आर.आर.
2 क्षारयुक्त पाण्यामुळे २ वर्षांत ७४ बळी; हजारोंना बाधा
3 तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनी बिबटय़ा विहिरीबाहेर
Just Now!
X