चंद्रपूर शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे महापालिकेचे सभापती रितेश तिवारी व काँग्रेसचे गटनेते संतोष लहामगे यांनी निवेदनातून केली आहे.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण नुकतेच नागपूरला आले असता गटनेते संतोष लहामगे, सभापती रामू तिवारी, माजी महापौर संगीता अमृतकर यांच्यासह ११ नगरसेवकांच्या गटाने भेट घेतली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष रसातळाला जात असून यासाठी शहर अध्यक्ष नंदू नागरकर दोषी आहेत, असे म्हटले आहे. नागरकर यांनी २००१ मध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर २००६ मध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामू तिवारी यांच्याविरोधात अपक्ष उभे राहिले. २०१२ मध्ये झालेल्या मनपा सभापतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसह पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली. याच कालावधीत महापौरपदाच्या निवडणुकीतही पक्षविरोधी काम केले.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवास तेच कारणीभूत आहेत. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेची पुनरावृत्ती बघायला मिळाली. नुकत्याच झालेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस गटनेते संतोष लहामगे यांनी बोलाविलेल्या बैठकीला ते गैरहजर होते, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत नागरकर व सुनिता लोढीया यांनी शिवसेनेचे या पदाचे उमेदवार आकाश साखरकर यांना हात उंचावून मतदान केले. अशा स्थितीत नागरकर काँग्रेसचे निष्ठावान कसे, हा प्रश्न सर्वाना पडला आहे.
शहरातील कोळसा व्यापारी, वाळू कंत्राटदार, लहान-मोठे बिल्डर्स, वाहतूक व्यवसायिक व डॉक्टरांना धमकावून खोटय़ा तक्रारी करणे त्यांनी सुरू केल्याने नागरिकांमध्ये काँग्रेसविषयी रोष निर्माण झाला आहे. ते पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याने त्यांची पक्षातून तात्काळ काढण्यात यावे, अशीही मागणी या निवेदनातून केली आहे. त्यांना पक्षातून काढले नाही, तर अनेक जण पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी विनंती या शिष्टमंडळाने चव्हाण यांना केली.
शिष्टमंडळात नगरसेवक दुर्गेश कोडाम, अनिल रामटेके, मेहेर सिडाम, राजेश अडूर, सुभेदिया कश्यप, ऐस्तेर शिरवार, एकता गुरले, अजय खंडेलवाल, एनएसयुआय अध्यक्ष कुणाल चहारे, पप्पु सिद्दीकी, पृथ्वी जंगम आदिंचा समावेश होता.