वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट व कागद उद्योग, महाऔष्णिक वीज प्रकल्प आणि भविष्यात येऊ घातलेले खासगी वीज प्रकल्प आणि त्यामुळे प्रदूषित झालेल्या चंद्रपूर जिल्हय़ात रेशीम उत्पादनाच्या नवीन उद्योगाने पाय रोवले असून ‘द ब्लॅक गोल्ड सिटी’, अशी ओळख असलेला हा जिल्हा आता रेशमी धाग्याचे मुख्य केंद्र झाला आहे.
औद्योगिक प्रगतीत आघाडीवर असलेला हा जिल्हा कोळसा, सिमेंट, कागद, वीज व इतर उद्योगांप्रमाणेच हा जिल्हा रेशीम उद्योगाचे मुख्य केंद्र बनलेला आहे. जिल्हय़ातील सात गावातील ५०० हेक्टर जमिनीवर ऐन व अर्जून वृक्षाच्या माध्यमातून रेशीम कोषाची निर्मिती केली जात आहे. तसेच पाथरी येथे जिल्हा रेशीम कार्यालय, टसर कोष बिज उत्पादन केंद्र, कोषापासून धागा निर्मिती केंद्र सुरू करून जिल्हा रेशीम अधिकारी पद निर्माण केले आहे. सुमारे ६०० कुटुंबे या उद्योगातून उदरनिर्वाह चालवित आहेत. चंद्रपूर जिल्हय़ात पारंपारिक करण्यात येणाऱ्या टसर कोसा रेशीम व्यवसायाला शासन प्रोत्साहन देणार असल्याचे वस्त्रोद्योग व पणन विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी सांगितले. सावली तालुक्यातील पाथरी येथील टसर रेशीम धागा निर्मिती व्यवसायाला नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. सहसंचालक ढवळे व रेशीम विकास अधिकारी श्रीधर झाडे यावेळी उपस्थित होते. या विभागाच्या लाभार्थ्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेण्यासाठी कुरसंगे यांनी पाथरी येथे भेट देऊन पाहणी केली.
पाथरी येथील ग्रेनेज विभाग, धागा निर्मिती तसेच वन क्षेत्रामधील ऐन व अर्जून वृक्षाची पाहणी केली. यासोबतच येथील लाभार्थ्यांसोबत चर्चा केली व शासनस्तरावर या व्यवसायाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पाथरी केंद्रातील कामकाजाबाबत रेशीम कोषाचे दर, वन विभागामध्ये येणाऱ्या समस्या, इत्यादीबाबत रेशीम विकास अधिकारी श्रीधर झाडे यांनी संबंधितांना सविस्तर माहिती दिली. सहसचिवांनी येथील सर्व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन या व्यवसायाच्या विकासासाठी सर्वानी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. चंद्रपूर जिल्हय़ात टसर कोसा उत्पादन पारंपारिकरित्या बऱ्याच वर्षांपासून घेण्यात येत आहे. टसर कोसा उत्पादन प्रामुख्याने वनामध्ये आढळणारे ऐन व अर्जून वृक्षाचे पाने खाऊन रेशीम अळय़ा कोष तयार करतात. हे रेशीम कोष वनामध्ये उत्पादित होत असल्याने या रेशमाला वन्य रेशीम असे संबोधिले जाते.
जल्हय़ात ब्रम्हपुरी, चिमूर, सावली या तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर ऐन व अर्जून वृक्ष वनक्षेत्रामध्ये आहे. याच प्रमाणे रेशीम विभागाने वन विभागाच्या ५०० हेक्टर क्षेत्रावर सात गावांमध्ये ऐन व अर्जून वृक्षाची सलग लागवड केलेली आहे. या भागातील ५०० ते ६०० ढिवर समाजातील कुटूंब हा व्यवसाय करतात व बऱ्याच कुटूंबाचे उपजीविकेचे साधन टसर कोसा रेशीम उत्पादन आहे. टसर कोसा उद्योगाचे विकासासाठी शासनाचे नव्यानेच रेशीम विकास अधिकरी हे पद निर्माण केले असून जिल्हा रेशीम कार्यालय, पाथरी ता. सावली येथे सुरू केले आहे.
या कार्यालयाचे पाथरी येथे टसर कोष बीज उत्पादन केंद्र, कोषापासून धागा निर्मिती केंद्र, या ठिकाणी सुरू आहे. २५ ते ३० महिला व पुरूषांना यापासून रोजगार मिळालेला आहे. याशिवाय बिजकोष निर्मितीसाठी पाथरी, सोनापूर, चिचबोडी, चिखली, आवळगांव, मेंडकी, मोटेगाव या ठिकाणी ५०० हेक्टर वन क्षेत्रामध्ये ऐन व अर्जून वृक्ष लागवड घेण्यात आलेली असून या ठिकाणी बिजकोष उत्पादनाचा कार्यक्रम राबविला जात आहे.