अवघ्या अडीच वर्षे वयाच्या एका मुलाचे अपहरण व त्याच्यावर पाशवी अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल चंद्रशेखर आत्राम याला सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. एका चिमुकल्याच्या बाबतीत हे घृणित कृत्य घडल्याने गाजलेल्या या प्रकरणात पोलिसांच्या तपासात राहिलेल्या त्रुटींमुळे आरोपीला संशयाचा फायदा देऊन न्यायालयाने त्याची सुटका केली आहे.
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, मूळचा छिंदवाडा येथील रहिवासी असलेला आरोपी चंद्रशेखर आत्राम (३१) हा सुरेंद्रगड, देशराजनगर झोपडपट्टीत दिलीप राणा यांच्या घरी गुड्डू बर्मन याच्यासह भाडय़ाने राहात होता. त्याच्यासोबत गणेश चौधरी हेही याच घरात भाडय़ाने राहात होते.
आत्राम व चौधरी हे दोघेही एकाच ठेकेदाराकडे फर्निचरला पॉलिश करण्याचे काम करत होते. त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होते आणि आत्राम हा चौधरी यांचा अडीच वर्षे वयाचा मुलगा गोलू याला चॉकलेट घेऊन देण्यासाठी किंवा इतर कारणाने नेहमी बाहेर घेऊन जात असे.
१४ मे २०१० रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास गोलूची आई घरी भांडी घासत असताना फक्त बनियनवर असलेला गोलू घराजवळ खेळत होता. यावेळी चंद्रशेखर आत्राम हा गोलूला चॉकलेट घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला, तो परत आला नाही. दुपारी साडेबाराच्या सुमारास गणेश चौधरी घरी आले, तेव्हा त्यांच्या पत्नीने गोलू दिसत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे गोलूचे वडील गुड्डू बर्मनसह बाहेर पडले, परंतु आत्राम कुठे दिसला नाही. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो घरी परत आल्यानंतर सर्वानी त्याला गोलूबाबत विचारले, परंतु त्याने गोलूला नेले नसल्याचे सांगितले. अखेर रात्री घरमालक व इतर शेजाऱ्यांसह गणेश चौधरी यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गोलू हरवल्याची तक्रार नोंदवली. यावेळी चंद्रशेखरही सोबत होता.
यानंतर आत्राम गायब झाला. त्यामुळे सर्वाचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याची शोधाशोध केली असता दुसऱ्या दिवशी तो सदर भागात सापडला. कसून चौकशी केली असता त्याने गोलूचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्या आधारे गिट्टीखदान पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास केला. यानंतर आत्राम हा पोलिसांना काटोल नाका ते कळमेश्वर मार्गावर घेऊन गेला आणि तेथे हनुमान मंदिराजवळील पुलाखाली त्यांना एक पांढऱ्या रंगाचे पोते दाखवले. यात गोलूचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
घटनेच्या १५ दिवस आधी आपण गणेश चौधरी यांना ५ हजार रुपये मागितले होते. त्यांनी देण्यास नकार दिल्याचा राग मनात ठेवून आपण गोलूचा खून केला, असे आत्रामने पोलिसांना सांगितले.
गोलूच्या शवचिकित्सेत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे आढळले. आत्राम याने घटनेच्या दिवशी गोलूला सोबत नेले आणि कळमेश्वर मार्गावरील एका पुलाखाली त्याच्याशी अमानुष कृत्य केले. यावेळी त्याने चिमुकल्या गोलूचे दोन हात आणि एक पाय सुतळीने पाठीमागे बांधून त्याच्या तोंडात स्कार्फचा बोळा खुपसला होता. यामुळे गोलू श्वास गुदमरून मरण पावला. यानंतर पोलिसांनी आत्रामविरुद्ध अपहरण, अनैसर्गिक संभोग व खून या आरोपांखाली गुन्हे दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या गुन्ह्य़ात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी या खटल्याची सुनावणी केली. चंद्रशेखर आत्रामविरुद्धचे सर्व आरोप सिद्ध झाल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. खुनाच्या गुन्ह्य़ासाठी मृत्यूदंड, तर खुनाच्या उद्देशाने अपहरण व चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार या गुन्ह्य़ांसाठी जन्मठेप अशी शिक्षा त्यांनी आरोपीला सुनावली होती.
या शिक्षेविरुद्ध आत्राम याने उच्च न्यायालयात अपील केले, तर त्याचवेळी सरकार पक्षाने फाशीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला.
या दोन्हींची एकत्र सुनावणी झाली. न्या. ए.पी. लवांदे व न्या. अरुण चौधरी यांच्या खंडपीठाने गेल्या २१ ते २३ जानेवारीपर्यंत या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय आज जाहीर केला.
घरमालक दिलीप राणा व त्यांची आई या दोघांनी आरोपीला गोलूला घेऊन जाताना शेवटचे पाहिल्याचे अभियोजन पक्षाचे म्हणणे होते. मात्र गोलूचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना आरोपी सोबत असतानाही त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितली नाही. शिवाय कुणीही आरोपीवर संशय असल्याचे नमूद केले नाही. आरोपीने गुन्ह्य़ाची कबुली दिल्यानंतर पोलिसांना घटनास्थळ दाखवण्यास घेऊन जातो म्हणून सांगितले, त्याची नोंद पोलिसांनी स्टेशन डायरीत केली नाही. त्याने घटनास्थळ दाखवताना आधी दाखवलेल्या दोन पुलांच्या खाली काही आढळले नाही व तिसऱ्या पुलाखाली मृतदेह आढळला. त्याने हे कृत्य केले असते, तर त्याला हा पूल नेमका माहीत असता, असे खंडपीठाने नमूद केले.
आरोपीने गोलूचा मृतदेह दाखवल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणचा केवळ ‘स्पॉट पंचनामा’ केला, ‘डिस्कव्हरी पंचनामा’ मात्र केला नाही. शिवाय आरोपीची वैद्यकीय तपासणी तीन दिवसांनी करण्यात आली, त्यावरून त्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे सिद्ध झाले नाही.
या अनेक बाबींमुळे आरोपीवरील आरोप संशयातीतरित्या सिद्ध होत नसल्याचे सांगून खंडपीठाने चंद्रशेखर आत्राम याला फाशीची शिक्षा देणारा सत्र न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला व त्याला संशयाचा फायदा देऊन त्याची सुटका केली. आरोपीची बाजू अॅड. अश्विन वासनिक यांनी मांडली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी युक्तिवाद केला, तर नितीन रोडे व संगीता जाचक यांनी त्यांना मदत केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2013 2:57 am