शासनाचे व महापालिकेचे भूखंड लिजवर किंवा बीओटी तत्वावर मिळवून तेथे भव्य व्यापारी संकुल उभारायचे, मग तेथील गाळे किंवा जमीन परस्पर विक्री करायची व मोठा नफा कमावण्याचा धडाका शहरातील जमीन व्यावसायिक व संस्थानिकांनी चालवला आहे. परिणामी, शहरातील मोठे भूखंड गिळंकृत केले जात असून शहर पोलीस ठाणे, कस्तुरबा शाळा, मुख्य मार्गावरील वनखात्याचे कार्यालय व सराई मार्केटच्या जागेवर या नफेखोरांची वक्रदृष्टी पडली आहे.
या शहरात मोक्याच्या शासकीय व निमशासकीय जमिनी कवडीमोल किमतीत पदरात पाडून कोटय़वधीचा नफा कमावणारी सोनेरी टोळीच जिल्ह्यात सक्रिय आहे. या टोळीने यापूर्वी कस्तुरबा मार्गावरील कमला नेहरू शाळा, नेताजी नगर भवन, राजकला चित्रपट गृहासमोरील महापालिकेचे गोदाम, श्री टॉकीजजवळील जुने मटन मार्केट व महात्मा गांधी शाळा या जमिनी गिळंकृत केल्या आहेत.
 जटपुरा गेटजवळील कोंडवाडा पाडून तेथेही व्यापारी संकुल उभारले. या सर्व ठिकाणी आता भव्य व्यापार संकुल, हॉटेल व दुकाने काढून विक्री केली. त्यातून मोठा नफा कमावला. सार्वजनिक बांधकाम विभागासमोरील मोकळ्या जागेवर संजय गांधी मार्केट उभारले. तेथील दुकाने महापालिकेची परवानगी न घेताच परस्पर लाखो रुपयाला विक्री केली आहेत. सराई मार्केटमधील महापालिकेच्या मालकीच्या दुकानांचीही अशीच विक्री करून लाखोची कमाई केली. या सर्व जमिनी बीओटी तत्वावर देण्यावरून तेव्हा वाद झाला होता. आता पुन्हा बीओटी व लिजवर देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.
शहरातील एकाही इमारतीत वाहनतळाची सोय नाही. त्यामुळे मुख्य मार्गावर धनराज भवनसमोरील चंद्रपूर वनपरिक्षेत्र विभागाचे कार्यालय ताब्यात घेऊन तेथे वाहनतळ व विद्यार्थी वसतीगृहाचा प्रस्ताव आहे. ही मोकळी जागा व त्याच पद्धतीने शहर पोलीस ठाण्याची जागाही मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेची सात मजली इमारत व आता नवीन इमारतीला वाहनतळ नाही. त्यामुळे गांधी चौकात वाहनाची कोंडी होती. ती सोडविण्यासाठी शहर पोलीस ठाणे अंचलेश्वर मंदिर मार्गावरील कस्तुरबा गांधी शाळेच्या जागेवर स्थलांतरित करायचे आणि शहर पोलीस ठाण्याची जागा मोकळी करायची. कालांतराने या मोकळ्या जागेवर व्यापार संकुल किंवा मॉल उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे सराई मार्केटमधील महापालिकेच्या गोदामाची भव्य जागा मॉलसाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी शहरात एवढी मोठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे या जागेवर मनपाची वास्तू उभारून तेथेच एका बाजूला वाहनतळाचा प्रस्ताव होता, परंतु हा प्रस्ताव बाजूला ठेऊन तेथे भव्य मॉल उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या भूखंडांचे लिज व बिओटीचे प्रस्ताव हेतुपुरस्सर समोर आले आहेत.
दुसरीकडे रेड क्रॉस सोसायटी व अन्य काही शैक्षणिक व सामाजिक संस्थांनीही मोक्याचे भूखंड गिळंकृत केले आहेत. रेड क्रॉस सोसायटीने तर जिल्हा सामान्य रुग्णालय, बाल संगोपन केंद्र, जयंत टॉकीजमागील मोकळी जागा व क्षय रुग्णालयात भूखंड मिळविले आहे. विशेष म्हणजे, मिळालेल्या शासकीय भूखंडावर व्यापार संकुल बांधून त्याची विक्री केली. आता ज्यांनी गाळे विकत घेतले ते २० ते २५ लाख रुपयात विनापरवानगी विक्री करीत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. तसेच काही शैक्षणिक संस्थांनी शाळा, कॉन्व्हेंट व महाविद्यालयांसाठी मोक्याचे भूखंड गिळंकृत केले आहेत. यात काही माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या संस्थांचाही सहभागी आहेत. दरम्यान, हे सर्व भूखंड शासनाने परत घेऊन स्वत:कडे जमा करावे, अशीही मागणी समोर आली आहे.
जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी होत असतानाही स्थानिक राजकारणी व सोनेरी टोळीच्या माध्यमातून हे भूखंड बळकावणे सुरूच आहे. विशेष म्हणजे, हे सर्व बघून जिल्हा परिषदेनेही त्यांच्या शाळांच्या जागांवर अशाच पद्धतीने व्यापारी संकुल व मॉल बांधण्याचा प्रस्ताव समोर केला आहे.