सहकार चळवळीला धक्का न लावता नव्याने सहकार कायदा आणून सहकाराला स्वायत्तता दिली जाणार आहे. नव्या घटना दुरुस्तीत स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करुन शासनाचे नियंत्रण कमी करीत या कायद्याचा नवा आराखडा मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
स्व. भाऊसाहेब थोरात व स्व. अण्णासाहेब िशदे यांच्या जयंती सोहळ्यात संगमनेरमध्ये ते बोलत होते. अ‍ॅड. रावसाहेब िशदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, विजयअण्णा बोऱ्हाडे, अरुण कडू, बाजीराव खेमनर, प्रेमानंद रुपवते, डॉ. संजय मालपाणी, दुर्गाताई तांबे, सुरेखा मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्कार ज्येष्ठ आमदार सा. रे. पाटील यांना, अण्णासाहेब िशदे पुरस्कार विवेक सावंत यांना व सहकारातील सवरेत्कृष्ठ कार्यकर्ता पुरस्कार जेऊर कुंभारी (कोपरगाव) येथील लहानुभाऊ नागरे यांना यावेळी देण्यात आला. मंत्री पाटील म्हणाले, सरकार सहकार कायद्यात ९७ वी घटनादुरुस्ती करीत आहे. सहकाराचा नवा कायदा हा आमुलाग्र बदलाचा असेल. राजकारण व समाजकारणात फरक असून ते त्या त्या पातळीवर व्हायला हवे. नव्या पिढीने हे बदल आत्मसात केले करुन काम करण्याची आवश्यकता आहे. राज्य भीषण दुष्काळाचा सामना करीत असून दुष्काळ निवारण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. पाणी, चारा आणि रोजगाराची मोठी समस्या या दुष्काळात आहे. कायमस्वरुपी दुष्काळ असलेल्या गावातही कायमस्वरुपी उपाययोजनासांठी नव्याने निर्णय घेतले जात आहे. महसूलमंत्री थोरात यांचे काम चांगले असल्याचे सांगत सरकारने शेतकऱ्यांना २५ हजार कोटींचे पीककर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले आहे त्याचा ६० लाख शेतकऱ्यांनी फायदा घेतल्याचे ते म्हणाले. राजीव खांडेकर म्हणाले, सध्या समाजात, राजकारणात लांगुलचालन, पुढेपुढे करण्याची वृत्ती वाढली आहे. हेच सध्या यशस्वी होण्याचे मार्ग बनले असून ग्लोबलायझेशनमुळे प्रत्येकाचा हव्यास वाढला. चंगळवादाचे विकृत चित्र माध्यमातून रंगविले जात आहे. सध्याच्या आपल्या समाजव्यवस्थेलाच एक आजार झाला असून त्यासाठी केवळ राज्यकर्त्यांना दोष देऊन चालणार नाही. राज्यकर्त्यांनीही आपल्या कृती आणि बोलीत अंतर ठेवता कामा नये असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा
कार्यक्रमापुर्वी पत्रकारांशी बोलतांना मंत्री पाटील यांनी नगर जिल्हयातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या २२ तारखेला जिल्ह्यात येणार आहेत अशी माहिती दिली. दुष्काळाचा सामना करण्यासाठी येत्या सहा महिन्यात ३ हजार कोटी रुपये लागतील असे त्यांनी सांगितले.