परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याच्या निर्णयाचे भारिप-बहुजन महासंघातर्फे स्वागत करण्यात आले, तर संभाजी सेनेने या निर्णयाविरोधात २६ जूनला विभागीय आयुक्तालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तालयावर या मागणीसाठी मोर्चा काढला होता. जालना येथेही काढलेल्या मोर्चात भटके विमुक्त व अनुसूचित जाती-जमातीतील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी होते. दि. १३ जुलैपर्यंत सरकारने या बाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मोर्चाद्वारे देण्यात आला होता. मंत्रिमंडळाने मागणी मान्य केल्याने सरकारच्या निर्णयाचे भारिप-बहुजन महासंघाने स्वागत केले.
दरम्यान, या निर्णयाला विरोध असल्याचा दावा काही संघटनांनी केला होता. तथापि, त्या अनुषंगाने कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही. या अनुषंगाने बोलताना प्रा. अविनाश डोळस म्हणाले, कृषितज्ज्ञ व्यक्तीचे नाव कृषी विद्यापीठाला मिळावे, ही मागणी सयुक्तिक होती. ती सरकारने पूर्ण केल्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे.
संभाजी सेनेचा २६ जूनला मोर्चा
विशिष्ट समाजाच्या मतदानावर डोळा ठेवून मराठवाडा कृषी विद्यापीठास वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची घोषणा केली, असा आरोप करून या नामांतरास संभाजी सेनेने विरोध दर्शविला आहे. त्यासाठी २६ जूनला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. संभाजी सेनेचे संस्थापक लक्ष्मण शिरसाठ, प्रदेशाध्यक्ष रामेश्वर िशदे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, नामांतरविरोधी कृती समितीचे अध्यक्ष किरण डोंबे, बापुराव कोल्हे आदींनी केले.