11 December 2017

News Flash

प्रेमाचा खांदेपालट

बॉलिवूडच्या प्रेमकथा संपता संपत नाहीत. दररोज अंगावरचे कपडे बदलून खुंटीला अडकवावेत त्याप्रमाणे या कलाकारांचे

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 26, 2013 12:18 PM

बॉलिवूडच्या प्रेमकथा संपता संपत नाहीत. दररोज अंगावरचे कपडे बदलून खुंटीला अडकवावेत त्याप्रमाणे या कलाकारांचे आपले जोडीदार बदलणे सुरू आहे. बॉलिवूडच्या ढीगभर प्रेमकथांमध्ये अगदी बोटावर मोजण्याइतक्या यशस्वी होतात. बाकी सगळे ‘रात गई बात गई म्हणत पुन्हा आपले प्रेमभंगाचे दु:ख रिचवण्यासाठी नवा खांदा शोधतात. सध्या नव्या वर्षांपासूनच या ‘खांदेपालटा’ला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी सैफ अली खान-करीना कपूर, विद्या बालन-सिध्दार्थ रॉय कपूर, दीपिका पदुकोण-सिध्दार्थ मल्या, रणवीर सिंग -सोनाक्षी सिन्हा आणि कतरिना कैफ -रणबीर कपूर प्रेमरंग उधळताना दिसत होते. वर्ष सरता करीना कपूर-खान झाली आणि विद्या रॉय कपूर झाली. मात्र, बाकीच्यांनी नव्या वर्षांत खांदेपालट केली आहे.
सध्या जोरदार चर्चा आहे ती दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी दुबईत चुपकेचुपके केलेल्या डेटिंगची. दीपिकाचा प्रेमभंगाचा सिलसिला सुरूच आहे. रणबीर कपूरबरोबर प्रेमाचा श्रीगणेशा करणाऱ्या दीपिकाला पहिल्याच प्रेमात धक्के सहन करावे लागले. रणबीरच्या विरहाचे दु:ख विसरण्यासाठी तिने सिध्दार्थ मल्ल्याच्या खांद्याचा आधार घेतला. मात्र, तिचा नाजूक भार त्याच्या खांद्याला फार काळ सहन झाला नाही. त्यानंतर तिचा लक्ष्य झालाय तो रणवीर सिंग. हे दोघेही संजय लीला भन्साळीच्या ‘राम-लीला’त काम करत आहेत. मात्र, या एकत्र काम करता करता दोघांच्याही प्रेमलीला सुरू झाल्यात. गंमत म्हणजे अवघ्या दोन वर्र्षांपूर्वी इंडस्ट्रीत आलेल्या रणवीरचा प्रेमइतिहास मात्र भलाथोरला आहे. ‘बँड बाजा बरात’ करताना तो अनुष्काच्या प्रेमात पडला, तर ‘लेडीज वर्सेस रिकी बेहल’च्या वेळी त्याला परिणीती चोप्रा आवडू लागली. ‘लुटेरा’च्या निमित्ताने सोनाक्षी सिन्हावर त्याचा जीव जडला आणि आता दीपिका पदुकोण. हे प्रेमप्रकरण तरी किती काळ टिकणार आहे?
दीपिकाला काडीमोड दिल्यानंतर ‘रॉकस्टार’ रणबीर काही काळ नर्गिस फाकरीबरोबर गुंतला होता. सध्या मात्र तो कतरिनाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. खरे म्हणजे कतरिना त्याच्या प्रेमात आहे. हे दोघेही लोकांच्या नजरा चुकवून एकत्र चित्रपट करतात, नवीन वर्ष-वाढदिवस सगळया खासमखास गोष्टी एकत्र साजऱ्या केल्या जातात. पण, मीडियासमोर आले की ‘आम्ही नाही हो त्यातले’.. असा या दोघांचा सुर असतो. काही का होईना रणबीरची सुपरफास्ट एक्स्प्रेस कतरिनावर येऊन थांबल्याने ऋषी आणि नीतूनेही सुटकेचा श्वास सोडला आहे.
प्रेमाला वयाचे, लग्नाचे आणि ‘गौरी’चेही बंधन नसते असे शाहरूखला वाटू लागले आहे. प्रियांकाच्या आंतरराष्ट्रीय कौतुकामुळे जवळपास प्रत्येकजण तिच्यावर फिदा आहे. मात्र, आजवर कधीही पत्नी गौरीशिवाय इथेतिथे न पाहणाऱ्या एसआरकेचाही संयम सुटू लागला आहे. दुबईत नुकत्याच झालेल्या पार्टीत गौरीच्या तीक्ष्ण नजरांनी आणि बोलांनी घायाळ झालेल्या प्रियांकाचे रडू पुसण्यासाठी गेलेल्या शाहरूखला अनेकांनी टिपले आहे. दोन बायकांमध्ये अडकलेला किंग खान पाहून दुबईतील त्याच्या चाहत्यांच्या जीवाचे पाणी-पाणी झाले. सध्या तरी या प्रेमकथांमध्ये प्रेमापेक्षा खांदेपालटच जास्त आहे. आता कुठे नवीन वर्ष सुरू झाले आहे. वर्ष पुढे सरकेल तशी ही यादी किती मोठी होईल याची कल्पनाही आपण करू नये हेच खरे!

First Published on January 26, 2013 12:18 pm

Web Title: change of love partner