उपनगरीय लोकल गाडय़ांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारच्या लोहमार्ग पोलिसांच्या खांद्यावर असली, तरी सध्या लोहमार्ग पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे महिलांची सुरक्षा टांगणीलाच लागल्याचे चित्र आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी आता लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वेला एक सूचना केली आहे. या सूचनेनुसार उपनगरीय गाडीतील डब्यांचा क्रम बदलणे आवश्यक आहे. एका गाडीतील महिलांसाठीचे सर्व प्रथम वर्गाचे डबे एकत्र केल्यास एकच पोलीस कर्मचारी या डब्यात तनात करता येईल, असे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.
रात्रीच्या वेळी प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास करताना एका महिला पत्रकाराचा मोबाइल फोन डब्यात घुसून बळजबरीने हिसकावल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये उपनगरीय रेल्वेमार्गावर महिलांबाबतच्या गुन्’ाांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचेही आकडेवारी सांगते. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वेला गाडीची रचना बदलण्याचा पर्याय सुचवला आहे.
सध्या लोहमार्ग पोलिसांना मध्य रेल्वेवरील सर्व उपनगरीय गाडय़ांमधील महिला डब्यांत सुरक्षारक्षक नेमण्यासाठी ६१८ पोलिसांची गरज आहे. प्रत्यक्षात लोहमार्ग पोलिसांकडे मध्य रेल्वेसाठी फक्त २३४ कर्मचारी उपलब्ध आहेत. पश्चिम रेल्वेवर ३१८ पोलिसांची गरज असताना प्रत्यक्षात १२८ पोलीस कर्मचारी महिला डब्यांमध्ये सुरक्षेसाठी तनात आहेत. या लोहमार्ग पोलिसांना होमगार्डचे सहाय्य होत असले, तरी त्यांची संख्याही कमीच आहे. मध्य रेल्वेवर २२५ होमगार्डची गरज असताना प्रत्यक्षात २०० होमगार्ड तनात आहेत, तर पश्चिम रेल्वेवर आवश्यक असलेल्या २४५ पेक्षा ४५ होमगार्ड कमी आहेत.
त्यामुळे आता लोहमार्ग पोलिसांनी महिलांसाठीचे प्रथम दर्जाचे डबे एकत्र करावेत, अशी सूचना केली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या गाडीच्या रचनेमध्ये पाच डबे महिलांसाठी राखीव आहेत. यापकी दोन डबे प्रथम वर्गाचे आहेत. पण लोहमार्ग पोलीस १२ डब्यांच्या एका गाडीत दोनपेक्षा जास्त पोलीस तनात करू शकत नाहीत. या दोन पोलिसांव्यतिरिक्त होमगार्डचा एक जवान गाडीत असतो. त्यामुळे प्रथम वर्गाचे दोन डबे एकत्र केल्यास या दोन्ही डब्यांत मिळून एकच कर्मचारी नियुक्त करता येईल, असे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच रात्री ११ वाजल्यानंतर काही विशिष्ट महिला डब्यांत पुरुषांनाही प्रवेश दिला जातो. हा नियमही बदलण्यात यावा, असे लोहमार्ग पोलिसांचे म्हणणे आहे.