गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरात गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्यवस्तीतील काही मार्ग वाहतुकीसाठी विशिष्ट कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच काही भाग ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ज्या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे, त्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली असून वाहतुकीतील हे बदल गणेश विसर्जनाच्या दिवशी रात्रीपर्यंत लागू राहतील, असे पोलीस आयुक्तालयाने म्हटले आहे.
गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी म्हटले आहे. पंचवटीतील निमाणी बसस्थानकावरून मालेगाव मोटार स्टँड, रविवार कारंजा या मार्गावरून होणारी राज्य परिवहन महामंडळाची शहर बस वाहतूक आणि इतर जड वाहनांना हा मार्ग दुपारी दोन ते रात्री १२ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. उपरोक्त काळात या मार्गावरील शहर वाहतुकीच्या बसेस व अवजड वाहनांची वाहतूक पंचवटी कारंजा, काटय़ा मारूती चौक, कन्नमवार पूल, द्वारका चौक मार्गे नाशिक व नाशिकरोड, अंबड, सातपूर व इतर ठिकाणी अशी राहील. सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसेस व इतर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना अशोकस्तंभ ते रविवार कारंजामार्गे पंचवटी हा मार्ग वाहतुकीला बंद राहणार आहे. ही वाहतूक अशोकस्तंभ, रामवाडी पूल, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका या मार्गावरून पंचवटीकडे जाईल.
सांगली बँक सिग्नल ते सारडा सर्कल पर्यंतचा मार्ग हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी दररोज सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकरोडकडून येणाऱ्या वाहनांना शालीमारमार्गे सीबीएसपर्यंतचा मार्ग वाहतुकीला बंद राहील. पंचवटीतून येणारी वाहने (अवजड वाहने व बसेस वगळता) रविवार कारंजा-सांगली बँक  सिग्नलवरून मेहेर, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौक, सारडा सर्कलमार्गे नाशिकरोडच्या दिशेने जावू शकतील. त्याचप्रमाणे नाशिकरोडवरून येणारी वाहने सारडा सर्कलवरून गडकरी चौक, मोडक सिग्नल, सीबीएस, मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे पुढे जाईल. अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यानच्या मार्गावर दोन्ही बाजुने कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नये याकरिता हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त किटकॅट चौफुली ते महाकवी कालिदास मंदिरमार्गे शालीमार चौकाकडे जाणारा रस्ता सायंकाळी सहा ते रात्री बारा या काळात वाहतुकीला पूर्णपणे बंद राहणार आहे.
या ऐवजी ही वाहतूक किटकॅट चौफुली, खडकाळी सिग्नल मार्गे शालीमार अशी वळविण्यात आली आहे. पंचवटी विभागातील सरदार चौक ते काळाराम मंदिर पर्यंतचा रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार आहे.