कल्याण-डोंबिवली महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई करण्यासाठी केलेली कोटय़वधी रुपयांची तरतुदीचा मलिदा अधिकारी आणि ठेकेदारांनी लाटल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. गेल्या काही वर्षांत पावसाळाच्या तोंडावर नालेसफाईचा देखावा उभा केला जातो. प्रत्यक्षात नालेसफाईची कामे केली जात नाहीत, अशी टीका सर्व पक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.
 काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांनी या विषयावर सर्वसाधारण सभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामावर नियंत्रण ठेवणारे अभियंते तसेच ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली.  नालेसफाईची कामे देऊन एक महिना झाला आहे. ठेकेदाराची कामे पूर्ण झाली नाहीत. असे असताना त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही, अशी भूमिका शिवसेनेचे गटनेते रवींद्र पाटील यांनी मांडली. एखाद्या प्रभागात नालेसफाईसाठी २२ लाखांचे कंत्राट दिले जाते. त्यामध्ये पाच लाख रुपये नालेसफाईचे काम असेल तर उर्वरित १७ लाख रुपये अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने गडप करतात, असा आरोप मनसेचे नगरसेवक शरद गंभीरराव यांनी केला. यावेळी प्रशासनातील एकही अधिकारी सभागृहात उपस्थित नव्हता. काटेमानीवली येथे एका विकासकाने नाल्याचा तोंडावर पत्रे लावून  नाल्यात उतरण्याचा मार्ग बंद केला आहे. हे पत्रे फेकून त्या ठिकाणी काम करून घेण्याची हिम्मत अधिकाऱ्यांमध्ये राहिलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी केला.  यावर्षी नालेसफाईसाठी सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. हे पैसे गाळात गेल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.