21 September 2020

News Flash

व्रतस्थ ज्ञानोपासक

वेगळे काही करण्याची जिद्द आणि प्रयत्नपूर्वक परिश्रमाचे खतपाणी याच्या शिदोरीवर शिक्षणासारख्या क्षेत्रात वेगळे काही व भरीव कार्य निश्चितच उभे राहू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या

| June 15, 2013 01:54 am

वेगळे काही करण्याची जिद्द आणि प्रयत्नपूर्वक परिश्रमाचे खतपाणी याच्या शिदोरीवर शिक्षणासारख्या क्षेत्रात वेगळे काही व भरीव कार्य निश्चितच उभे राहू शकते, याचे उत्तम उदाहरण लातूरच्या उमाकांत होनराव यांनी समोर ठेवले आहे. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे दिशादायी मार्गदर्शन हे त्यांचे बलस्थान आहे. ग्रामीण भागात शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी विद्यार्थीवर्गात नवी ऊर्मी जागविण्यास त्यांचे प्रयत्न पूरक व प्रेरक ठरले आहेत.
पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडून विद्यार्थी-पालकांसमोर ध्येयवादी स्वप्न ठेवून ते साकारण्यास सुयोग्य मार्गदर्शनाची हमी देणारे गुरुजी म्हणून होनराव यांनी लातुरात ओळख निर्माण केली आहे. उदगीर तालुक्यातील तोंडारसारख्या अक्षरओळखही नसलेल्या गावच्या कुटुंबात उमाकांतचा जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे एम. ए. बी. एड.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. लातूरच्या केशवराज विद्यालयात २६ वर्षे शिक्षक म्हणून सेवा केली. पुणे येथील पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाच्या अभ्यासक्रम पुनर्रचना पाठय़पुस्तक लिखाण समितीवर मराठवाडा विभागातून त्यांची निवड झाली. १६ वर्षे त्यांनी हे कार्य केले, या दरम्यान एनसीआरटीच्या मंडळींशी त्यांचा संपर्क आला. देशभरात शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्र कसा मागे आहे? हे त्यांच्या निदर्शनास आले.
महाराष्ट्रातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यास काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटे. मात्र, दिशा सापडत नव्हती. ना मनुष्यबळ, ना आर्थिक तरतूद, त्यामुळे कल्पनेचे इमले बांधूनही कृती मात्र घडत नव्हती. याच दरम्यान लातूर पॅटर्नचे नाव देशभर गाजत होते. अशा वेळी संस्थात्मक पातळीवर वेगळे काही करावे, असे त्यांच्या मनाने घेतले व शाळेत रजा टाकून कर्नाटक, आंध्र, केरळ, राजस्थान, दिल्ली, पंजाब व बिहार राज्यांमध्ये जाऊन तेथील शालेय अभ्यासक्रमाची माहिती घेतली. त्यातून सीबीएसई अभ्यासक्रम शिकवणारे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
हैदराबादचे प्राचार्य आंध्रदेव व त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ६ मार्च २००४ रोजी रिलायन्स अॅकॅडमी नावाने उपक्रम सुरू केला. यात तब्बल २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. डॉक्टर, इंजिनियरिंग व्यतिरिक्त मोठी स्वप्ने विद्यार्थ्यांनी जरूर पाहावीत, यासाठी त्यांनी वातावरणनिर्मिती सुरू केली. पहिल्याच वर्षी त्याची आश्वासक फलश्रुती झाली. एनआयटीसाठी ७ विद्यार्थी, तर एका विद्यार्थ्यांची आयआयटी, जेईई मेन्समध्ये निवड झाली. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात नवीन माणूस येतो आहे, हे पाहून त्यांच्याकडील सुमारे सव्वादोनशे विद्यार्थी व बाहेरून आलेल्या प्राध्यापकांना अन्य संस्थांनी आपल्याकडे खेचले. परंतु त्यामुळे होनराव अडचणीत आले. जिद्द मात्र कायम होती. धाडस दाखवून स्वत:चे राहते घर व पत्नीचे दागिने विकले. आपण सुरू केलेले व्रत अर्धवट सोडायचे नाही ही उमेद कायम बाळगली. यातूनच नव्या जोमाने बिहार, कोटा अशा अन्य ठिकाणच्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आणले. गेल्या दहा वर्षांत राज्यातील सुमारे २८ जिल्हय़ांमधील विद्यार्थ्यांनी होनराव यांच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले. संगमनेरचे सहय़ाद्री महाविद्यालय, औरंगाबादचे देवगिरी महाविद्यालय व नांदेडच्या यशवंत महाविद्यालयालाही मार्गदर्शन करण्यात आले.
सकाळी ७ ते रात्री १०.३० पर्यंत विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले जाते. आयआयटी उत्तीर्ण प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना राज्याचा अभ्यासक्रम शिकवण्यास स्वतंत्र प्राध्यापक, राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करून घेण्यासाठी कोटा, हैदराबाद, नवी दिल्ली येथील नामवंत प्राध्यापक, तर विद्यार्थ्यांचा रोज किमान चार तास अभ्यास करून घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अशी रचनाच उपलब्ध केली आहे. लातूर परिसरातील विद्यार्थ्यांना आयआयटी होण्याचे स्वप्न दाखवून ते साकारण्याची यंत्रणा पहिल्यांदा उपलब्ध करण्याचे काम होनराव यांनीच केले. त्यामुळेच त्यांनी स्थापन केलेल्या त्रिपुरा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी राज्यभरातले विद्यार्थी आतूर असतात. त्यानंतर काळाची पावले ओळखून अन्य संस्थांनीही असे अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
प्रतिकूल स्थितीशी सतत दोन हात केलेल्या होनराव यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, पराभवाने खचून जायचे नाही व यशाने हुरळून जायचे नाही, याचे बाळकडू आई-वडिलांकडून मिळाले. त्याच्या जोरावरच आपण येथवर वाटचाल करू शकल्याचे ते सांगतात. संस्थेला दहा वर्षे झाली, तरी अजूनही संस्था भाडय़ाच्या जागेत आहे. मिळणाऱ्या पैशातून गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी अधिक खर्च व्हायला हवा. त्यामुळे स्वत:च्या वैयक्तिक भौतिक सुविधेच्या लालसेत ते कधी अडकले नाहीत. शैक्षणिक क्षेत्रात लातूर जिल्हय़ाने अनेक उंचीची माणसे पाहिली आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या उमाकांत होनराव यांचे यामुळेच कौतुक केले जाते.

यशवंत गुणवंत..
नीट, आयएसईईटी, आयआयटी, जेईई, एआयईईई, बीआयटीस, एनडीए, आयआयएसटी, एआयपीएमटी, एएफएमसी व एमएचटी-सीईटी या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम गेल्या दहा वर्षांत शिकवला गेला. आतापर्यंत ४५ विद्यार्थ्यांना आयआयटीत प्रवेश मिळाला. २५२ विद्यार्थ्यांनी एआयईईईमध्ये प्रवेश मिळविला. १८ विद्यार्थी एनडीए झाले. २७ विद्यार्थी बीट्स उत्तीर्ण झाले. दोन विद्यार्थ्यांना आयआयएसटीत प्रवेश मिळाला. यावर्षी राज्यातून आयएएस परीक्षेत दुसरा आलेला कौस्तुभ दिवेगावकरही रिलायन्सच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:54 am

Web Title: charchetala chehra umakant honrao
Next Stories
1 धनदांडग्यांच्या कचाटय़ातून गंगाखेडला सोडवा- गव्हाणे
2 चोरून विक्री केलेल्या १८ मोटरसायकली जप्त
3 विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; लातूरचे शैक्षणिक संकुल हादरले
Just Now!
X