राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित सावनेरच्या डॉ. हरिभाऊ आदमने कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुमारे ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्राचार्यानी नियमबाह्य़ प्रवेश शुल्क वसुली केली असून त्याविरोधात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आवाज उंचावला आहे. प्राचार्याच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष खदखदत असून विद्यापीठाचे नाव पुढे करून उकळण्यात आलेले शुल्क परत मिळावे या मागणीसाठी त्यांनी स्वाक्षरी मोहीम छेडून पहिल्यांदाच स्वत:च्या महाविद्यालयाच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. विद्यार्थ्यांच्यावतीने महाविद्यालयातील प्रा. मिलिंद साठे यांनी कुलगुरूंना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांची बाजू मांडली.
महाविद्यालयात बी.कॉम.च्या ३२० जागा असून तीन तुकडय़ा आहेत तर बी.ए.ची १२० ची प्रवेश क्षमता असलेली तुकडी आहे. विद्यापीठाने ५० टक्के शिक्षक नसलेल्या महाविद्यालयांना प्रवेश करण्यास परवानगी नाकारल्यांपैकी सावनेरमधील राम गणेश गडकरी महाविद्यालय आहे. ते महाविद्यालय बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा आदमने महाविद्यालयकडे होता. आदमने महाविद्यालयात आलेल्या सुरुवातीच्या पन्नास-पाऊणशे विद्यार्थ्यांकडून प्राचार्यानी विद्यापीठाने ठरवून दिलेले १ हजार ३०० रुपये प्रवेश शुल्क घेतले. मात्र, विद्यार्थ्यांचा वाढलेला ओघ बघून त्यांनी बी.ए. व बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य़ शुल्क घेणे सुरू केले. मात्र, पावती १ हजार ३०० रुपयांचीच दिली. याची वाच्यता झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पाच महिन्यापूर्वीच महाविद्यालयाच्या विरोधात विद्यापीठाकडे तक्रार केली. मात्र, पत्र पाठवण्याची औपचारिकता करण्यापलीकडे विद्यापीठाने काहीही ठोस कारवाई केली नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. म्हणूनच सोमवारी एनएसयूआयच्या नेतृत्वाखाली आदमने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यासंदर्भात प्राचार्य डॉ. वीरेंद्र जुमळे यांना विचारले असता कोणतेही वाढीव प्रवेश शुल्क घेतले नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

नियमबाह्य़ प्रवेश शुल्क घेतलेल्या बी.ए. व बी.कॉम. प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांची काही प्रातिनिधिक उदाहरणे- कपिल वानखडे याच्याकडून ४ हजार, अश्विनी ताजणे- ३ हजार ३००, शीतल चौधरी- ३ हजार ७००, आरती गाढवे- ४ हजार, विक्की चौरे- ५ हजार, वैशाली लिखार- ६ हजार ३००, प्रकाश तायवाडे- ४ हजार ५००, दर्शनी गाडीगोणे ६ हजार ३००, शुभांगी टेकाम- ७ हजार, आणि शालिनी बारापात्रे, रागिणी शर्मा व प्रशांत हांडे प्रत्येकी ६ हजार इत्यादी. शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून घेतलेल्या वाढीव प्रवेश शुल्काविरोधात स्वाक्षरी मोहिमेत भाग घेतला.