‘चतुरंग’चे २४ वे रंगसंमेलन २७ व २८ डिसेंबर रोजी डोंबिवलीत आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचा या सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. नाटय़, कला क्षेत्रातील दिग्गज या रंगसंमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेच्या पटांगणावर हा सोहळा रंगणार आहे. शनिवार, २७ डिसेंबर रोजी रंगसंमेलनाचे उद्घाटन नाटककार आणि राष्ट्रीय कला अकादमीचे (एनएसडी) संचालक प्रा. वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अजित भुरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. गौरवग्रंथ आणि स्मरणिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. शास्त्रीय रागांवर आधारित रचनांचा जल्लोष कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये रवींद्र चारी (सतार), सत्यजित तळवलकर (तबला), जिनो बँक्स (ड्रम्स), शेल्डन डिसिल्वा (बेस गिटार), संगीत हळदीपूर (की बोर्ड) सहभागी होणार आहेत. गीतरामायणावर रचलेला चाळीस नर्तक, नर्तकींचा अनोखा नृत्याविष्कार रंगसंमेलनात पाहण्यास मिळणार आहे. नृत्य कलावंत सोनिया परचुरे यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. रविवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता चहापान संमेलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या संमेलनात चित्रपट, नाटय़ कलाकार, अभिनेते, अभिनेत्री सहभागी होणार आहेत.  
रत्नाकर मतकरी यांची मुलाखत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, लेखक गणेश मतकरी घेणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी मोहन आगाशे यांच्या हस्ते रत्नाकर मतकरी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी डॉ.विनय सहस्रबुद्धे, उद्योजक दीपक घैसास, अच्युत गोडबोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नाटक, नट आणि नाटय़भाषेचे सामथ्र्य दाखवणारा अकरा कलाकारांचा स्वगतांचा नजराणा या वेळी पेश करण्यात येणार आहे. ‘रंगवैभव’ म्हणून या कार्यक्रमाचे संयोजन लेखक योगेश सोमण, दिग्दर्शक मंगेश कदम, सुनील बर्वे, स्पृहा जोशी, पुष्कर श्रोत्री यांनी केले आहे.