कांदा निर्यात शुल्क कमी करावे, कांदा व बटाटा पिके जिवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, कांद्याला हमी भाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन कळवण तालुका छावा मराठा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी विलास पाटील यांना देण्यात आले.
केंद्र शासनाने कांदा व बटाटा पिकाचा जिवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचे छावाने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात शुल्क ३०० डॉलर करण्यात आले होते. त्यामुळे कांद्याचे भाव नियंत्रणात आले होते. असे असताना पुन्हा कांदा निर्यात शुल्कात वाढ करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा हा निर्णय असल्याने शासनाने तो त्वरीत मागे घेण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. कांदा लागवडीच्या खर्चापासून काढणीपर्यंतचा खर्च वाढल्याने कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव न दिल्यास छावा मराठा संघटना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शिवा तेलंग, कळवण तालुका प्रमुख प्रदीप पगार, विजय वाहुळे, वाल्मिक राजपूत आदी उपस्थित होते.