विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढवेल, तसेच अशोक चव्हाण यांना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, अशी गर्जना माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रविवारी केली. त्याला काँग्रेसनेही सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावरून जिल्ह्य़ात काँग्रेस-राष्ट्रवादीमधील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.
राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भोकर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी चव्हाण यांच्याविरोधात राष्ट्रवादी निवडणूक लढवेल, चव्हाणांचा पराभव होईल, त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार नाही, असे भाकीत मांडत तोफ डागली. आगामी निवडणुकीत गेल्या निवडणुकीइतके मतदान मिळवून दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. चिखलीकरांच्या आरोपानंतर काँग्रेसने सोमवारी पत्रक काढून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या वल्गनेची खिल्ली उडवली.
पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षात थारा राहिला नाही म्हणून राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातात बांधणाऱ्या चिखलीकरांनी स्वबळाची भाषा वापरण्यापूर्वी स्वत:ला लोहा-कंधार मतदारसंघात उमेदवारी मिळेल काय, याची काळजी करावी. एक हजारांच्या आसपास जमाव असलेल्या मेळाव्यात चिखलीकरांनी नेहमीप्रमाणे आकसातून गरळ ओकली. कंधार-लोहा तालुक्यांतून हद्दपार झालेल्या चिखलीकरांनी आता इतरत्र लुडबूड सुरू केली आहे. त्यांचा बोलविता धनी मुंबईत आहे. चिखलीकर हा केवळ मुखवटा आहे, याची जाण कंधार-लोहा तालुक्यातल्या मतदारांना आहे.
विकासाचे राजकारण केल्यामुळे अशोक चव्हाण यांना तीन वेळा जनतेने प्रचंड मतांनी विजयी केले. याउलट चिखलीकरांनी मात्र मेव्हणा, मुलगा, भावजय, पुतण्या यांच्या राजकारणातील विकासाशिवाय अन्य कोणताही ‘प्रताप’ केला नाही. आधी कंधार-लोहा सांभाळा व नंतर भोकरकडे बघा असा सल्ला डॉ. श्याम तेलंग, माधवराव पांडागळे, कल्याण सूर्यवंशी यांच्यासह लोहा-कंधार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिला.
चिखलीकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत असल्याने विरोधी पक्षासह सामान्य नागरिकांचीही करमणूक होत आहे.