अंबरनाथमध्ये सामुदायिक शेतकी सोसायटीच्या जागेवर पुन्हा एकदा अनधिकृत चाळींचे पीक फोफावले आहे. अंबरनाथ शहराच्या पूर्व विभागात सामुदायिक शेतकरी सोसायटीच्या मालकीची तब्बल २१० एकर जागा असून त्यातील बरीचशी जमीन मोकळी आहे. यापूर्वी २००८, २००९ तसेच २०११ मध्ये सोसायटीच्या जागांवर बांधण्यात आलेली अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली होती. मात्र आता पुन्हा काही भूमाफियांनी चाळी बांधून सोसायटीच्या जागेवर अतिक्रमण केले असून याबाबत विचार विनिमय करण्यासाठी सोसायटीने शनिवारी, २६ जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे.
यापूर्वी शहर नियोजनासाठी सोसायटीने दिलेल्या भूखंडांवरही अतिक्रमण झालेले आहे. शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी सोसायटीने दिलेल्या सहा एकर भूखंडावर आता झोपडपट्टी झाली आहे. तसेच महाविद्यालयासाठी दिलेल्या भूखंडावरही अतिक्रमण झाले आहे.
सात लाखांत घर
सदनिकांचे दर परवडत नसल्याने अनेक कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळीतील स्वस्त घरांचा पर्याय स्वीकारतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथमध्ये सात लाखांत चाळीतले घर मिळते. मात्र बांधकाम अनधिकृत असल्याने या स्वस्त घरांचा पर्याय चांगलाच महागात पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सोसायटीच्या जागेवरील घर घेण्याच्या मोहात पडू नये, असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.